अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात बनावट औषध विक्रेत्यांनी द्राक्ष बागायतदारांची लूट सुरू केली आहे. या बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.तालुक्यात द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. त्याखालोखाल ऊस, डाळिंब, पालेभाज्या पिकविल्या जातात. यामुळे यासाठी लागणारी औषधे व खतावर वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
कृषी दुकानांची मोठी उलाढाल होत असते. याचा फायदा घेत काही कृषी दुकानदार बनावट औषधे विक्री करतात. यामुळे अशा खत व औषध दुकानांची तपासणी करणे, कोणत्या दुकानातून बनावट औषध, खते विक्री केली जातात का, याची माहिती घेऊन कारवाई करणे हे तालुका कृषी कार्यालयाचे काम आहे, पण त्याकडेच दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.तालुक्यातील आगळगाव येथील तानाजी बाबर यांच्या दीड एकर द्राक्षबागेतील घड बनावट औषध फवारणी केल्यामुळे जळाले आहेत. त्यांचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कृषी विभागाने कारवाई केलेली नाही. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे याबाबत संपर्क केला असता, त्यांनी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम चालू असल्यामुळे चौकशीस विलंब झाल्याचे सांगितले.तालुक्यात अशा अनेक गावांतून बनावट कंपनीचे दलाल शेतकऱ्यांना फसवून औषध व खते विक्री करीत आहेत. या बनावट खते व औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग कारवाई करणार का? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. कृषी विभाग या बनावट कंपन्यांवर कारवाई करण्यास जेवढी टाळाटाळ करेल तेवढे शेतकऱ्यांचे नुकसान जास्त होणार आहे.