सांगली : कांद्याचा दर एका दिवसात २७०० वरून ५०० रुपये प्रतिक्विंटल केल्यामुळे बुधवारी सांगलीच्या विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांत जोरदार वादावादी झाली. संतप्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फळ मार्केटला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या गोंधळानंतर अखेर व्यापाऱ्यांनी मंगळवारच्या सौद्याप्रमाणेच बुधवारी प्रतिक्विंटल २७०० रुपये भाव दिल्याने वादावर पडदा पडला.
सांगलीतील मंगळवारच्या सौद्यात कांद्याला प्रतिक्विंटल २७०० रुपये भाव मिळाला होता. तीन हजार क्विंटल मालाची आवक झाली होती. याबाबतची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर बुधवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मंगळवेढा, सांगोला, इंदापूर येथूनही कांद्याची मोठी आवक झाली. तब्बल १० हजार क्विंटल माल अचानक आला. सौद्यावेळी अचानक व्यापाऱ्यांनी पाचशे रुपये दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला.
कांदा उत्पादकांनी याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दिली. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा सकाळी साडेसात वाजता फळ मार्केटमध्ये दाखल झाले. त्यांनी संतप्त शेतकऱ्यांसह मार्केटला कुलूप घालण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांशी त्यांची वादावादी झाली. त्यानंतर राजोबा यांनी बाजारात आलेला सर्व कांदा जिल्हाधिकारी कार्यालयात फेकण्याचा इशारा दिला. त्यानंतर बाजार समितीच्यावतीने संचालक कुमार पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तासाच्या मुदतीनंतर दर मिळाला
बाजार समितीच्या कार्यालयात शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी मंगळवारप्रमाणे दर मिळण्यासाठी तासाची मुदत दिली. त्यानंतर आंदाेलनाची तीव्रता पाहून व्यापाऱ्यांनी २७०० रुपये दर जाहीर केला.
व्यापाऱ्यांनीही मांडले म्हणणे
अचानक इतका दर कमी होण्याबाबत व्यापाऱ्यांनी सांगितले की, बाजारात अपेक्षेपेक्षा अधिक माल आला. मागणीपेक्षा माल जास्त असल्याने त्याच्या विक्रीचा प्रश्न होता. त्यामुळे दर कमी झाला. राजोबा यांनी हा दावा फेटाळत एका दिवसात २२ लाख लुटण्याचा हा डाव होता, असा आरोप केला. तीन तासांच्या गोंधळानंतर या वादावर पडदा पडला.