राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:11 PM2023-05-03T12:11:08+5:302023-05-03T12:12:23+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवामुळेच राजकीय हेतूने कटकारस्थान करून माझ्यावर व सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला गेला. यापूर्वी माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तरीही मला गुंड म्हटले जात आहे. याचे आश्चर्य वाटते. भाजपने माझ्याविरुद्ध एक तरी पुरावा द्यावा, मी नगरसेवक व युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असे आव्हान नगरसेवक मनोज सरगर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिले.
सरगर म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीत मी नव्हतो. तलवारी नाचवण्याचा, दहशत पसरवण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. हे भाजपचे कटकारस्थान आहे. ज्या ठिकाणी तलवारी नाचवल्या त्यासह संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे. त्यात कुठेही मी किंवा माझे सहकारी गैर कृत्य करताना आढळल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली होती.
पोलिसांनाही ही वस्तुस्थिती माहिती होती. त्यामुळे त्यांनी गुन्हे दाखल करण्यास नकार दिला होता. मात्र भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पोलिसांवर राजकीय दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष हर्षद कांबळे म्हणाले, नगरसेवक मनोज सरगर व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे केली आहे.
भाजपच्या आंदोलनात गुन्हेगारांचा सहभाग
मनोज सरगर म्हणाले, भाजप मला गुंड म्हणत आहे. पण माझ्यावर आजपर्यंत एकही गुन्हा नाही. मग मी गुंड कसा?, याउलट माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी संजयनगर पोलिस स्टेशनच्या आवारात भाजपच्या संघटन मंत्र्यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनातच खुनाच्या गुन्ह्यात आरोप असलेला एक जण सहभागी होता. अन्यही गुन्हेगार तेथे होते. त्यामुळे माझ्यावर गुंडगिरीचे भाजपचे आरोप म्हणजे ' चोराच्या उलट्या बोंबा ' आहेत, अशी टीका केली.