सावळाराम भराडकर - वेंगुर्ले -रात्री दहाची वेळ. चोहीकडे जेऊन झोपण्याची घाई सुरू होती. काही जण जेऊन शतपावली करत होते. तर काही जण दारात बसून गप्पा मारत होते. चोहीकडे सामसूम होत असतानाच वेंगुर्लेतील मारूती मंदिरात रडण्याचा आवाज आला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी जवळ जाऊन पाहणी करताच ७० वर्षाची एक म्हातारी मंदिराच्या कोपऱ्यात विव्हळत होती. नागरिकांनी याची कल्पना देताच वेंगुर्ले पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. विव्हळणाऱ्या त्या वृद्ध मातेला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. ती मूकबधीर असल्याने तिचा नेमका पत्ता समजला नाहीच, पण बेपत्ता असल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून देऊनही त्या वृद्धमातेकडे कोणीच न फिरकल्याने अखेर तिला संविता आश्रमात दाखल करण्यात आले. यावेळी भावनाविवश झालेल्या त्या मातेला वृध्दापकाळात वाऱ्यावर सोडलेल्या कुटुंबियांचं वाईट वाटलं असेल, पण परक्या लोकांनी दिलेला मायेचा आधार मात्र तिला लळा लावून गेला.वेंगुर्ले मारुती मंदिर परिसरात ६ जून रोजी रात्री १० वाजता ही वृद्ध महिला बेशुध्दावस्थेत आढळून आली होती. वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेंगुर्ले पोलिसांनी तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर ती शुद्धीवर आली. मात्र, मुकी असल्याने तिची कौटुंबिक माहिती मिळणे कठीण होते. वेंगुर्ले पोलिसांनी अनोळखी वृद्धा आढळली असून नातेवाईकांनी तिला घेऊन जावे, असे आवाहन वृत्तपत्राद्वारे केले होते. मात्र, कोणीही जबाबदारी न घेतल्याने आणि पोलिसांनाही तिच्या कुटुंबीयांबाबत माहिती न मिळाल्याने अणसूरचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे व देवेंद्र आंगचेकर यांच्या मध्यस्थीने पणदूर-अणाव येथील संविता आश्रमाचे व्यवस्थापक संदीप परब यांच्याशी संपर्क साधून तिला आश्रमात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपचारानंतर वृद्धेची संविता आश्रमात रवानगी करण्यात आली. यावेळी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे कर्मचारी टी. टी. कोळेकर, संविता आश्रमच्या व्यवस्थापिका दर्शना गवस, उषा सुपल, वाहनचालक कैलास यादव व वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वेंगुर्ले पोलिसांकडून मदतीचा हात!वेंगुर्ले पोलीस निरीक्षक रतनसिंह रजपूत तसेच सहकारी कर्मचाऱ्यांनी वृध्देवर उपचाराबरोबरच जेवणाचीही व्यवस्था केली होती. दोन दिवस तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. मात्र, काहीच तपास न लागल्याने तिला संविता आश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतला. महिलेची ओळख पटल्यास त्वरित वेंगुर्ले पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बेशुद्धावस्थेत मिळालेल्या त्या वृद्धेवर वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर ती शुध्दीवर आली. पुढील आठवडाभर ती रुग्णालयात उपचार घेत होती. या दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर यांनी घेतलेल्या काळजीने तिचे या सर्वांशी भावनिक ऋणानुबंध जुळले. त्यामुळे येथून जाताना ती मानेने नकाराचा इशारा करीत होती. ४ समाजातील निराधार, व्याधीग्रस्तांना आधार देणाऱ्या या संविता आश्रमाला सर्वतोपरी सहाय्य करणे, हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.
कुटुंबाकडून वाऱ्यावर; परक्यांकडून आधार
By admin | Published: June 17, 2015 11:28 PM