कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील शेतकरी शंकर महादेव पाटील (वय ४५) यांचा शेतामध्ये चारा मशीनवर काम करताना विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी, शेतकरी शंकर पाटील बुधवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले होते. शेतातील शेडमध्ये कडबाकुट्टी मशीनवर चारा बारीक करत असताना त्यांना विजेचा जोरात शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले. थोड्या वेळाने मुलगा शुभम शेतात आला असता, वडील बेशुद्ध अवस्थेत दिसले. वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही विजेचा धक्का लागला. यावेळी बाजूला असणारे चुलतभाऊ नागेश पाटील व गजानन पाटील या शेतकऱ्यांनी वीज बंद करून त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पाटील यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.