लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य शासनाने कर्जमाफीच्या आदेशामध्ये अनेक त्रुटी ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणूनच या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची जनजागरण यात्रा दि. २२ रोजी सांगलीत येणार आहे. यानिमित्ताने सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दि. २२ रोजी सकाळी १० वाजता शेतकरी एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार व हमाल चळवळीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांनी दिली.विविध शेतकरी संघटनांची शुक्रवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत, या मागण्यांसाठी जनजागरण यात्रा सुरु आहे. ही यात्रा दि. २२ जुलैस सांगलीत येणार आहे. त्यानिमित्ताने सांगलीत मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांची जनजागृती करून सांगलीतील मेळावा यशस्वी करणार आहे. सोमवारपासून तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, ध्वनिक्षेपकावरून प्रचार करणे, गाववार बैठका घेऊन प्रचार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवारी मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांची आरग येथे बैठक, सायंकाळी कवठेमहंकाळ येथे, तर रात्री शिरढोण येथे बैठक होणार आहे. मंगळवारी कवठेएकंद (ता. तासगाव), पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, इस्लामपूर व शिराळा येथेही बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॉम्रेड उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, अॅड्. के. डी. शिंदे यांनी आभार मानले.यावेळी कॉ. रमेश सहस्त्रबुध्दे, सुमन पुजारी, शशिकांत गायकवाड, विकास मगदूम, सुभाष पवार, अशोक खाडे, सचिन पाटील, तुळशीराम गळवे, सम्मेद पाटील, कॉ. दिगंबर कांबळे, नितीन महिंद, विकास भोसले आदी बैठकीस यावेळी उपस्थित होते.सरकारविरोधात लढणार : देशमुखशासनाने कर्जमाफीच्या निर्णयात शेतकऱ्यांना फसविले आहे. शासनाने कर्जमाफीसाठी ठरवलेल्या निकषामुळे गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. कर्जाची फिरवाफिरवी केलेला शेतकरी वंचित राहत आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरची रक्कम अगोदर भरण्यास सांगितले जात आहे. पाऊस लांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यास यातून बाहेर काढण्याची गरज असताना, सरकार त्यांची परीक्षा पाहत आहे. शेतकरी आता हारणार नाही, तर हातात रूमण घेऊन सरकारच्या विरोधात लढणार आहे, असा इशाराही कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला.
सांगलीत २२ रोजी शेतकरी एल्गार मेळावा
By admin | Published: July 14, 2017 11:04 PM