करंजवडे (ता. वाळवा) : येथे गवत कापणाऱ्या शेतकरी वसंत उर्फ अशोक बाबुराव पाटील (वय ४८) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उठले आहेत. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या पाटील यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर करंजवडेसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अधिक माहिती अशी, येथील वसंत उर्फ अशोक पाटील हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुरवकी नावाच्या मळ्यात चारा आणण्यास गेले होते. उसाच्या पिकाला पाणीही सोडले होते. बांधावरती गवत कापत बसले होते. डोक्याला टॉवेल बांधलेला होता. विळ्याने गवत कापत असताना अचानक समोरून कोणतीही चाहूल लागू न देता बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. झडप मारळ्यानंतर बिबट्याचा एक पंजा अशोक पाटील यांच्या डोक्यावरील टॉवेलमध्ये तर दुसरा पंजा छातीवरती आदळला. बिबट्याच्या पंजाचे तीक्ष्ण नख लागून पाटील रक्तबंबाळ झाले. डोक्यावरती टॉवेल असल्याने मोठी दुखापत झाली नाही. पाटील यांनी प्रतिकार करताना बिबट्यावर विळ्याने हल्ला केला. विळ्याचा वार झाल्याने बिबट्याने त्यांना सोडून देत पळ काढला. गवतावरती बिबट्याला लागलेल्या विळ्यामुळे रक्त पडले होते.
बिबट्यासोबत झटापटीमुळे पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटून रक्ताने माखले. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. हल्ला झाल्यापासून जवळच देवर्डे गाव आहे. तेथे अपघातात बिबट्या ठार झाला होता. परिसरात चार ते पाच बिबट असल्याची चर्चा होती. बुधवारी हल्ला करणारा बिबट्या त्यातीलच असावा अशी शक्यता आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.