लक्ष्मण सरगर
आटपाडी : फोंड्या माळरानावर आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे शेतकरी सदाशिवराव पाटील यांनी श्वेत चंदन झाडाची लागवड केली आहे. यामुळे माळरानावर पर्यायी शेती व्यवसायाला सुगंधी रुप दिले आहे.
सदाशिवराव पाटील यांची करगणी-बनपुरी रस्त्याच्या पूर्वेला सात एकर मुरमाड माळरान आहे. येथे जेसीबी मशीनच्या सहाय्याने दहा बाय दहा फुटावर चरी घेत श्वेत चंदन झाडे लावली आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे संपूर्ण ठिबक सिंचन केले आहे.
श्वेत चंदन रोपे ही पाच महिन्याची लागवड केली असून एक रोप श्वेत चंदन व एक लिंब असे एकाआड एक झाडे लावली गेली आहेत. २१०० रोपे प्रतिरोप ४० रुपयांप्रमाणे म्हैसूर येथून पोहच मिळाली. एकूण सात एकरमध्ये दहा बाय दहा अशी लागवड केली आहे. आंतरपीक म्हणून चंदनाच्या रोपाबरोबर तुरी लावल्या आहेत.
आतापर्यंत एक लाख ५० हजारांहून अधिक खर्च झाला आहे. शासनाच्या ई पीक ॲपद्वारे पीक पेरा नोंद करत कार्बन क्रेडिट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण बागेला झटका पद्धतीचे कुंपण करण्याचे नियोजन आहे.
संपूर्ण बागेचा विमा उतरविला जाणार असून श्वेत चंदन रोपे लावल्यापासून काही दिवस ससा या प्राण्यापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. रोप लागवड केल्यापासून सुमारे १२ ते १५ वर्षांत सुगंधित गाभा तयार होऊन झाड तोडणीस येते.
नव्या प्रयोगांची गरज
करगणीचे शेतकरी सदाशिवराव पाटील यांनी केलेले फोंड्या माळरानावर श्वेत चंदन झाडाची लागवड व नियोजन उत्कृष्ट असून आटपाडी सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी आपल्या कल्पकतेच्या जीवावर नवनवे प्रयोग यशस्वीरीत्या करीत आहेत. तरुण शेतकऱ्यांनी असे प्रयोग करण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे.