लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलांचीवाडी गावच्या एका वयस्कर शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजी भाषेत संवाद साधत आपली कैफियत मांडली होती. या वयस्कर शेतकऱ्यास अखेर न्याय मिळाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ विजेची जोडणी करून देत शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या भावनेला साद घातली आहे. वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकरी चव्हाण यांनी चक्क इंग्रजीमध्ये संभाषण साधत वीज चोरी पकडण्यासाठी आला आहात तर मला लगेच तात्काळ वीज जोडणी द्या त्यासाठी मी तयार असल्याचे इंग्रजीतून संभाषण केल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमासह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.आटपाडी तालुक्यामध्ये महावितरणच्यावतीने वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज चोरी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून शेतीच्या विद्युत पंपासाठी वीज चोरी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले. ही चोरी पकडण्यासाठी यमाजी पाटलांची वाडी याठिकाणी पथक गेले होते. यावेळी सहाय्यक अभियंता सुनील पवार यांना वयस्कर शेतकरी वेताळ चव्हाण यांनी विद्युत पंपासाठी वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे सर्व साहित्य जप्त करत असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी चक्क इंग्रजी मधून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तुम्ही कायदेशीर कारवाई करा मला काही अडचण नाही. माझे वकील तुम्हाला त्याचे उत्तर देतील असे सांगतच मला जागेवरच वीज कनेक्शन देण्याची मागणी केली. त्यांचे हे इंग्रजीतील संभाषण सोशल मीडियीवर व्हायरल झाले होते.दरम्यान, गुरुवारी आटपाडी महावितरण उपविभागाचे मुख्य अभियंता संजय बालटे, सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनी य.पा.वाडीचे शेतकरी वेताळ चव्हाण यांची भेट घेत त्यांना कृषी पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ जोडणी करून देत त्याच्या मागणीला न्याय दिला.
..अखेर 'त्या' शेतकऱ्यास मिळाली रीतसर वीज जोडणी; अधिकाऱ्यांसमोर इंग्रजीतून मांडल्या होत्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 4:38 PM