इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतमाल कोठेही विकता येतो. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे केवळ राजकीय नाट्य असून, त्यामध्ये शेतकरी हिताचा विचार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य व देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी २८ नोव्हेंबरपासून रघुनाथ पाटील यांनी सुरू केलेली जनप्रबोधन यात्रा आज वाळवा तालुक्यात आली होती. क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, हणमंतराव पाटील, इकबाल जमादार उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी एकमेकांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. ऊस उताऱ्यात २ टक्के आणि उतारा काढण्याच्या पद्धतीत १ टक्का चोरी करून शेतकऱ्याचे टनामागे ८५५ रुपयांचे नुकसान केले आहे. तोडणी वाहतुकीत ४०० रुपयांची लूट होते. तसेच कारखान्यात तयार होणारा उपपदार्थांचा हिशेब केल्यास ४ हजार रुपयांहून अधिक दर मिळू शकतो. मात्र शेट्टी, खोत या नेत्यांनी २८५० च्यावर एफआरपी न मागण्याचे पाप केले आहे. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर रास्तभाव मिळायला हवा. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची निव्वळ घोषणा केली. त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनीच आता शेतमालाचा रास्त भाव पाहिजे का नको? हे ठरवायला हवे. राज्यातील आमदार, खासदारच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यासाठी जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या चोऱ्या कोण करतंय, हे दाखविण्यासाठीच ही प्रबोधन यात्रा सुरू आहे.
यावेळी माणिकराव पाटील, धनपाल माळी, शंकरराव मोहिते, अविनाश पाटील, सर्जेराव पाटील, मारुतराव राठोड, राधाकिसन गडदे उपस्थित होते.