लाेकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. खत कंपन्यांनी प्रतिबॅग तीनशे ते सातशे रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पादनात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड सद्यस्थितीत सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आवश्यक कागदपत्रेही मिळत नाहीत. तरीही खत कंपन्यांकडून भाववाढ यंदा भाववाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होणार नाही असे
काही नामांकित खत कंपन्यांकडून
सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र बहुतांशी सर्व कंपन्यांनी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची
लाट असून याचा उद्रेक होण्यापूर्वी केंद्र सरकारने लक्ष द्यावे खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
चौकट :
अशी झाली आहे दरवाढ
डीएपी खताची किंमत १२०० रुपयांवरून १९०० रुपयांवर तर १०-२६-२६ ची किंमत ११७५ रुपयांवरून १७७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय १२:३२:१६ ची किंमत ११९० वरून १८०० तर २०:२०:० ची किंमत ९७५ वरून १३५० झाली आहे. पोटॅश ८५० वरून १००० रुपयांवर गेले आहे. सुपर फॉस्फेट (पावडर) ३७० वरून ४७० तर सुपर फॉस्फेट (दाणेदार)४०० वरून ५०० वर पोहोचले आहे. खतांच्या कंपनीनुसार कमीजास्त प्रमाणात अशीच भाववाढ झाली आहे.