इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट आणि शाब्दिक चकमक उडाली. तासाभराच्या या आक्रमक आंदोलनानंतर विजेचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
स्वाभिमानीचे भागवत जाधव म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेली १३ दिवस महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन केले होते. वाळवा तालुक्यातील शेतीचे वीज बिलाची दुरुस्ती केल्याशिवाय एक पैसुद्धा भरणार नाही. होणाऱ्या रोषाला महावितरण जबाबदार राहील. शेतकऱ्यांनी ताबडतोब वीज बिले दुरुस्ती करून घ्यावे.
इस्लामपूर उपविभागाचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांची गाडी रोखली. महावितरणच्या कार्यालयाला कुलपे लावली. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपअभियंता कारंडे म्हणाले, वीज बिल दुरुस्तीसाठी गावनिहाय मेळावे घेतले जाणार आहेत. यात शेतकऱ्यांनी आपली वीज बिले दुरुस्त करून घ्यावीत.
आंदोलन सुरू असतानाच वाळवा तालुक्यातील ताबंवे, धोत्रेवाडी, येवलेवाडी, कासेगाव, नवेखेड, जुनेखेड शिरगाव, वाळवा, भवानीनगर, बिचुद, येडेमच्छींद्र या गावातील वीज जोडण्या व विद्युत प्रवाह खंडित केलेली डीपी सुरू करण्यात आले. करांडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी रविकिरण माने, ब्रह्मानंद पाटील, शिवाजी पाटील, एस. यू. संदे, शिवाजी मोरे, अधिक जाधव, संजय पाटील, अवधूत जाधव, प्रदीप माने, अवधूत पाटील, किरण पाटील, किरण सुतार, रमेश पाटील, सुभाष शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.