तासगाव : तासगाव तालुक्यातील सावर्डे, मनेराजुरी, तासगाव, चिंचणी, वाघापूर व वंजारवाडी येथील शेतकऱ्यांची ३२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला आहे. याप्रकरणी अशोक डोंगरा चंदीगड व रवी माने गोटेवाडी याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद शंकर कुंडलिक माने सावर्डे यांनी दिली आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत माने यांनी म्हटले आहे, व्यापारी अशोक डोंगरा व रवी माने हे दोघे गेले अनेक वर्षांपासून आमच्या भागात द्राक्ष खरेदी करत होते. यामुळे त्याने विश्वासार्हता निर्माण केली होती. जानेवारी ते मार्च या कालावधीत त्याने सावर्डे, मनेराजुरी, तासगाव, चिंचणी, वाघापूर, वंजारवाडी या गावातील काही शेतकऱ्यांची उधारीवर द्राक्ष खरेदी केली. त्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. यानंतर डोंगरा याने तासगाव येथून पोबारा केला व रवी मानेने उडवा उडवीची उत्तरे दिली. जानेवारी ते मार्चदरम्यान द्राक्षाची खरेदी केली असून अद्यापही ते पैसे देत नाहीत. ही रक्कम ३३ लाख २२ हजार इतकी आहे. याप्रकरणी अशोक डोंगरा व रवी माने यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल मारुती गायकवाड यांनी दिली, तर याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव अन्नछत्रे करत आहेत.
Sangli: द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची ३२ लाख २२ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 3:20 PM