सांगली : राजारामबापू कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमेतून प्रति टन १४३ रूपये इतर प्रकल्पांच्या नावाखाली कपात केली जात आहे. केवळ जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. या कपातीचा सर्वोदय कारखान्याच्या सभासदांना कसलाही लाभ होणार नाही. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याने को-जनरेशन, नक्त मूल्यच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून प्रति टनामागे १४३ रूपये कपात केले आहेत. याचा लाभ ‘राजारामबापू’च्या सभासदांना होणार आहे. ‘सर्वाेदय’चे १४ हजार व जत येथील डफळे कारखान्याचे २६ हजार सभासदांना, ते राजारामबापू कारखान्याचे सभासद नसल्याने कोणताही लाभ होणार नाही. उलट ही रक्कम कपात केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.एफआरपीतून कसलीही रक्कम कारखान्याला कपात करता येत नाही. याविरोधात आवाज उठविल्यानंतर कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी न घेण्याची धमकी दिली आहे. आ. जयंत पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी तर आफ्रिकेतील गुंतवणुकीच्या फॅन्टसीमुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. ही रक्कम कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)‘सर्वाेदय’च्या सभासदांना ३०० रुपयांचा तोटाराजारामबापू कारखान्याच्यावतीने साखराळे, वाटेगाव, जत व सर्वोदय ही युनिट चालविली जातात. साखराळे येथे साखर उतारा १२.८५ टक्के, वाटेगावचा १२.८५, जतचा ११.७५, तर सर्वाेदय कारखान्याचा उतारा १३.0३ टक्के आहे. ‘सर्वोदय’ने स्वतंत्र गाळप केले असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरात प्रति टन २०० रूपये जादा दर मिळाला असता. मात्र चार युनिटचा सरासरी उतारा कमी निघत असल्याने सर्वाेदय कारखान्याच्या सभासदांना प्रतिटन ३०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
जयंतरावांच्या महत्त्वाकांक्षेमुळे शेतकरी वेठीस
By admin | Published: October 09, 2015 11:08 PM