कवठेमहांकाळ : नफेखोरीतून व्यापाऱ्यांनी खरेदी दर पाडल्याने कवठेमहांकाळच्या बाजारात मंगळवारी शेतकऱ्याने दीडशे किलो कारली चक्क फुकट वाटली. सागर दोडमिशे (रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे या हतबल तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याकडून कवडीमोलाने शेतमाल घ्यायचा आणि ग्राहकाला तो भरमसाट नफ्याने विकायचा, यामुळे ही वेळ आल्याचे त्याने सांगितले.
सागर दोडमिशे या भाजीपाला उत्पादकाने दीड एकरात कारल्याची लागवड केली आहे. लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी दोन लाख रुपये उत्पादन खर्च आला. बाजारपेठेत मात्र व्यापाऱ्यांनी तीन रुपये खरेदी दर लावला. तीच कारली किरकोळ बाजारात ग्राहकांना ४० रुपये किलो या दराने विकली जात आहेत, अशी बेफाम नफेखोरी सुरू आहे.
कवठेमहांकाळ येथे मंगळवारी आठवडा बाजार होता. दोडमिशे यांच्यासह तीन ते चार कारली उत्पादक शेतकरी बाजारात कारली घेऊन आले होते. त्यावेळी सर्वच व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी तीन रुपये किलोने दिली तरच घेऊ, असे सांगितले. दहा किलोची पिशवी त्यांनी ३० रुपयांनी मागितली. तीच पिशवी ग्राहकांना विकण्यासाठी चारशे रुपये दर लावल्याचे दिसून आले. किलोमागे तब्बल ३७ रुपये फायदा उकळत असून, या नफेखोरीत शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या सागर दोडमिशे यांनी आणखी तिघा शेतकऱ्यांना एकत्र केले. लोकांना फुकट देऊ, पण कवडीमोलाने व्यापाऱ्यांना देणार नाही, असा पवित्रा घेत ‘कारली घ्या फुकऽऽट’ असे ओरडून-ओरडून ती ग्राहकांना वाटून टाकली.
कोट
व्यापाऱ्यांच्या नफेखोरीला शेतकरी कंटाळले आहेत. याविरोधात काहीतरी उपाययोजना करण्यात यावी. शेतकऱ्याकडून तीन रुपयांनी भाजी घ्यायची आणि ग्राहकांना ४० रुपये किलोने विकायची, हा कुठला न्याय? यामध्ये शेतकऱ्यांचे मरण आहे.
-सागर दोडमिशे, शेतकरी