सांगली : कोयनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचे योग्य नियोजन न करता उलट नदीकाठी उपसाबंदीचा आदेश लागू केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी एक न्याय व सांगली जिल्ह्यास एक न्याय देणाऱ्या प्रशासनाने, पिके वाळून चालल्याने तातडीने उपसाबंदी उठवावी, यासह इतर मागण्यांसाठी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपसाबंदी उठवावी, अन्यथा रोषाला सामोरे जावे, असा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला. यंदा झालेले कमी पाऊसमान व धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरू केलेल्या उपसाबंदीच्या विरोधात जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्यावतीने क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चास आमराईपासून सुरूवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. उपसाबंदी उठविण्यात यावी, या प्रमुख मागणीसह कोयनेच्या पाण्यातून वीज निर्मिती बंद करून सर्व पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी ठेवण्यात यावे, बहे बंधारा ते नागठाणे बंधारा उपसाबंदी उठविण्यात यावी, जून महिन्यात पाऊस सुरू होईपर्यंत सर्व ठिकाणी समान पाणी वाटप करण्यात यावे, चांदोलीचे पाणी मिरजेपासून पुढे देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी अरूण लाड म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यातीलच शेतकरी अडचणीत आहेत. शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय घट जाणवत आहे. आज शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मात्र पाण्याचे समान न्याय हक्काने वाटप झाले असते, तर ही वेळच आली नसती. यंदा पाऊसमान समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत असल्याने, प्रशासनाने मान्सून सक्रिय होईपर्यंत उपसाबंदी लादू नये. प्रशासनाला जागे करण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करण्यात येत असून, तरीही उपसाबंदी लादल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करत जिल्हा बंद करू. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत, आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी उपसाबंदीचा निर्णय आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल यावर आपली भूमिका मांडली. शासनाकडून उपसाबंदी लागूच ठेवल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अरुण लाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, जे. पी. लाड, दिलीप पाटील, विजय महाडिक, पोपट फडतरे, के. बी. पाटील, अनिल लाड, विश्वनाथ मिरजकर, विजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)बंदी उठविण्यासाठी प्रयत्न : गायकवाडजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याने सध्या लागू करण्यात आलेली उपसाबंदी उठविण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. उपसा बंदीचा निर्णय पुढे न वाढवता अन्य पर्यायांवर पाटबंधारे विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बंदी उठविण्यासाठी प्रयत्न : गायकवाडजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याने सध्या लागू करण्यात आलेली उपसाबंदी उठविण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. उपसा बंदीचा निर्णय पुढे न वाढवता अन्य पर्यायांवर पाटबंधारे विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शिवरायांच्या वंशजांनी जिल्ह्याचे नव्हे, तर सर्वांचे नेते व्हावे!जिल्ह्यातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत आला असताना, जिल्ह्यातील एकाही नेत्याने याविरोधात आवाज उठवला नाही. याउलट सातारा जिल्ह्यात पाणी मिळत नसल्याने शिवरायांचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी तंबी दिली आहे. मात्र, त्यांनी, तुम्ही शिवरायांचे वंशज आहात, हे ध्यानात ठेवत केवळ जिल्ह्याचे नेतृत्व न करता सर्वांचे नेतृत्व करावे, असे आवाहन यावेळी अरुण लाड यांनी केले.सांगलीत झालेल्या बैठकीतील निर्णयमोर्चानंतर आंदोलक व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत, मध्यंतरी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने ४८ तासांची उपसाबंदी वाढविण्यात येणार, उद्या (मंगळवार) पासून उपसाबंदी उठविण्यात येणार, उपसाबंदीबाबत अनियमितता असणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे व कोयनेतील वीजनिर्मिती बंद करून पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी वापर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
उपसा बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: May 30, 2016 11:17 PM