लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथा परिसरातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी मशागतीची अवजारे दुरुस्तीसाठी लोहार, सुतारांकडे गर्दी केल्याचे ग्रामीण भागामध्ये सध्या चित्र आहे.
मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती करणे व नवीन तयार करणे आदी कामासाठी सुतार व लोहारांकडे गर्दी दिसू लागली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र उपलब्ध आहे. या परिसरात खरीप हंगामातील प्रमुख पिके म्हणजे ज्वारी, बाजरी व काही कडधान्ये होय. कमी पाण्यावर मोठे उत्पादन देणारी ही पिके आहेत. त्याचप्रमाणे मटकी, मूग, उडीद, तूर, काळा हुलगा, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकेही घेतली जातात. या सर्व पिकांच्या पेरणीपूर्वी शेतीची मशागत करणे अत्यावश्यक असते. नांगरणी, कुळवणी, पेरणी आदींसाठी अलीकडच्या काळात काही शेतकरी यांत्रिकी साहाय्य घेत असले तरी अनेक शेतकरी हे आपली पूर्वापार व पारंपरिक पद्धतीचाच अवलंब करतात. या शेतकऱ्यांनी तिफण, कुळव, खुरपे, कुदळ, खोरे आदी अवजारांच्या दुरुस्तीसाठी सुतार आणि लोहार यांच्याकडे गर्दी केली आहे.