लोकमत न्यूज नेटवर्क
संख : म्हैसाळ उपसा योजनेच्या सहाव्या टप्प्यात घोलेश्वर (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांनी गेल्या तेरा वर्षांपासून मोबदल्यासाठी लढा दिला आहे. तरीही त्यांना जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळाला नाही, तो त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली. या मागण्याचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडेही दिले आहे..
निवेदनात म्हटले की, म्हैसाळ सहावा टप्पा मुख्य कालव्याअंतर्गत घोलेश्वर येथील शेतकऱ्यांची शेत जमीन मुख्य कालव्यासाठी २००९ मध्ये अधिग्रहण केलेली आहे. आज अखेर शेतकऱ्यांना कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा लाभ मिळाला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार लेखी, तोंडी, प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मागणी केली आहे.
पाटबंधारे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चाही करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा आज अखेर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. मोबदला तर मिळाला नाहीच. उलट सोडलेल्या पाण्यातून शेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा, अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य, शेतकरी सलीम गवंडी यांनी दिला आहे.