कोकरुड : सात बाऱ्यावर नाव एकाचे, सर्व्हे नंबर दुसऱ्याचा, सात बाऱ्यावर काही नावे आहेत, तर काही गायब झाली आहेत, अशा अनेक चुका शिराळा तालुक्यातील सातबारा उताऱ्यांवर दिसत आहेत. त्यांची दुुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अनेकांच्या सातबाऱ्यावर तालुका दुसरा दाखवीत असल्याने ऑनलाइन सात-बाऱ्यामध्ये सगळा गोंधळ दिसून येत आहे. शासनाने महसूल विभागातील खाते उतारा, सातबारा, फेरफार, वारस दाखले, खरेदी-विक्री व्यवहारासह अनेक गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत. मात्र, ऑनलाइन खाते उतारा, सातबारामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून येत आहेत. येळापूर, गवळेवाडी, मेणी परिसरातील अनेक सर्व्हे नंबरवर कडेगाव, खानापूर, पलूस तालुक्यांची नावे दाखवीत असल्याने ऑनलाइनमध्ये अगोदरच गोंधळ सुरू असताना पुन्हा वेगवेगळ्या तालुक्यांची नावे उताऱ्यावर आली असल्याने अनेक प्रकारच्या चुकांची दुरुस्ती शासनाने करून गावच्या चावडीमध्ये दुरुस्ती केलेल्या ऑनलाइन उताऱ्याचे वाचन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.