सांगली : गेल्यावर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडे आली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तातडीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण केले.
पंचनामे पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जिल्ह्यासाठी ३८ कोटी १ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. या निधीपैकी ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.
तालुकानिहाय गतवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वाटप
तालुका | प्राप्त निधी | शेतकऱ्यांना वाटप निधी |
मिरज | ९ कोटी ६१ लाख | ९ कोटी ५६ लाख |
तासगाव | १३ कोटी १९ लाख | १२ कोटी ५७ लाख |
वाळवा | ५ लाख ९२ हजार | ५ लाख ९० हजार |
शिराळा | ५५ हजार | ५५ हजार |
पलूस | ३ कोटी ३५ लाख | ३ कोटी १३ लाख |
कडेगाव | १ लाख ९१ हजार | १ लाख ९१ हजार |
खानापूर | ३ लाख ३० हजार | ३ लाख ३० हजार |
आटपाडी | ६ लाख ६० हजार | ६ लाख ३० हजार |
कवठेमहांकाळ | २ कोटी ८३ लाख | २ कोटी ७१ लाख |
जत | ६ कोटी ९६ लाख | ५ कोटी ७२ लाख |
एकूण | ३८ कोटी १ लाख | ३५ कोटी २१ लाख |