सांगली : शेतीमालावरील निर्बंध उठविण्याचे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. उशिरा का होईना त्यांनी निर्बंध उठविल्याबद्दल शेतकरी, ग्राहकांनी स्वागत केले आहे. पुन्हा मंत्री समिती नेमल्यामुळे सरकारला निर्णय बदलण्यास संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकरी, ग्राहकांनी केली आहे. शेतकरी संघटनांनी तर अंमलबाजवणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांनी मात्र निर्णयास विरोध केला आहे. (प्रतिनिधी)मान्यवरांच्या प्रतिक्रियाकायद्याने शेतीमालावरील निर्बंध उठविणे बंधनकारक होते. तरीही सरकारने बंदी उठविण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी गेला. निर्बंध उठविल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु, यासाठी पुन्हा मंत्री समिती नेमण्याची गरजच नव्हती. म्हणूनच या सरकारविरोधात पुन्हा न्यायालयातच आम्हाला जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पैशाची लूट होत आहे.- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.मुख्यमंत्री, पणनमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. शेतकऱ्यांमार्फत त्यांचे आभार मानतो. २८ राज्यांचा अभ्यास केला. यावेळी अडत खरेदीदारांकडूनच घेतली जात होती. काही राज्यांत अडत घेतलीच जात नाही. मग, महाराष्ट्रातच असे निर्बंध का? याचा अभ्यास केला. यातूनच महाराष्ट्रातील शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.- सदाभाऊ खोत, आमदार.शरद जोशी यांनी अनेक वर्षांपासून शेतीमाल नियमनमुक्त करण्याची मागणी केली होती. या प्रश्नावर आंदोलनेही केली होती. अखेर सरकारने शेतीमालावरील निर्बंध उठवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा त्यासाठी आम्हाला पुन्हा आंदोलने करावी लागतील.- संजय कोले, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना युवा आघाडी.केंद्र शासनाच्या योजनानुसार हा बदल आहे. या बदलामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडा त्रास होईल. परंतु, त्यानंतर त्यांना चांगलाच फायदा होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. यामध्ये बाजार समित्यांचेच नुकसान आहे. ग्राहकांच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर निर्णय आहे. याचे आम्ही स्वागत करतो.- मनोहर सारडा, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली.शासनाने शेतकरी आणि ग्राहकांच्यादृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा चांगला व दर्जेदार माल बाजारपेठेत येण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्राहकांना चांगला आणि कमी किमतीत माल मिळण्यास मदत होणार आहे. दलालांकडून शेतकरी आणि ग्राहकांची मध्येच आर्थिक लूट होत होती, ती थांबण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी मात्र बाजारपेठेपर्यंत माल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.-डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत.शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समित्याची हमी होती. बाजार समितीच्या परिसरात शेतीमाल आल्यानंतर तेथे घेणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत होती. यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. पैशाचीही हमी होती. निर्बंध उठल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमी राहणार नाही. व्यापाऱ्यांकडून पैसे बुडविले जाण्याची शक्यता असून, तशा घटना द्राक्ष, डाळिंब बागायतदारांबाबतीत घडत आहेत.-अभय मगदूम, माजी अध्यक्ष, अडत व्यापारी असोसिएशन, सांगली.
शेतकरी हसले; मार्केट रुसले
By admin | Published: June 29, 2016 11:33 PM