इस्लामपूर : उसाचे गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही एफआरपीप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नाही. सध्या कारखानदारच राज्यकर्ते झाल्यामुळे ही कारवाई होत नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सोमवारी, दि. २८ रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली.
तहसील कचेरीजवळील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीस रघुनाथदादा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सोनहिरा कारखान्याने ३१७६ रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे, तर राजारामबापू कारखान्याने २५०० रुपयांचे बिल काढले आहे. त्यांच्याकडून प्रतिटन ७०० रुपये कमी दिले आहेत. गुजरातच्या कारखान्यांशी तुलना केली असता, १५०० रुपये कमी दिले गेले आहेत. या सर्व बाबींवर विचार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या बेकायदेशीर बाबींविरुद्ध बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी केले आहे.