लाेकमत न्यूज नेटवर्क
दूधगांव : कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही. सध्या शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. लवकरात लवकर कारखान्यांनी ऊस बिलाचा हप्ता जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.
एप्रिलअखेरीस वळवाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्याची मशागतीची कामे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने कामे खोळंबली आहेत. अशातच काही शेतकऱ्यांनी अजून ऊसची भरणी केलेली नाही.
भागातील कारखान्यांनी ऊस तोडीवेळी ८०-१०-१० च्या फॉर्मवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. त्याप्रमाणे कारखाना सुरू असताना पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. फॉर्मप्रमाणे राहिलेली दहा टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आत देणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले होते. कारखाना बंद होऊन महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. मशागतीसाठी पैसे नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी मशागतीची कामे करण्यास सुरुवात करतो. कारखान्यांनी उसाचे पैसे दिले नसल्यामुळे कशाने मशागतीचे कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.