शेगाव : सिंदूर (ता. जत) येथे शेतातील बांधाच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत पिरगोंडा रूद्रगौडा पाटील (वय ५५) या शेतकऱ्याचा खून झाला. सिंदूर येथील बसस्थानकासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. या मारामारीत आठजण जखमी झाले. पिरगोंडा पाटील व गुराप्पा बाळाप्पा हिप्परगी या दोघांचा शेतजमिनीतील बांधावरून वाद आहे. जमिनीची कोणत्याही प्रकारची मोजणी न झाल्याने, बांध नेमका कोणत्या शेतात येतो, हे स्पष्ट झालेले नाही. आठ दिवसांपूर्वी हिप्परगी यांनी जेसीबीने पाटील यांचा बांध फोडल्याचा संशय पाटील यांना होता. बांध का फोडला, यावरून दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाला होता. गुरुवारी गावात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजवंदन कार्यक्रम संपल्यानंतर पिरगोंडा पाटील गावातील बसस्थानकासमोर येऊन थांबले होते. त्याचवेळी गुराप्पा हिप्परगीही तेथे आले होते. बांध फोडल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये तेथे पुन्हा वादाचा भडका उडाला. या दोघांत झालेल्या मारामारीत हिप्परगी यांना जादा मार लागल्याने, ते रागाने गेले आणि नातेवाईकांसह काठ्या, कुऱ्हाडी, गज घेऊन आले. तोपर्यंत पाटील यांनीही नातेवाईकांना बोलावून घेतले होते. सकाळी-सकाळीच दोन्ही गटांत तुंबळ हाणामारीस सुरुवात झाली. एकमेकांवर काठ्या, कुऱ्हाड, गजाने घाव घालण्यात आले. यात दोन्ही बाजूचे आठजण जखमी झाले. यामध्ये पिरगोंडा पाटील यांना कुऱ्हाडीचा वर्मी घाव बसल्याने ते जाग्यावरच कोसळले. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हाणामारीत आठजण जखमी झाले असून, त्यातील शिवकांत पाटील, गौडाप्पा पाटील, चिदानंद मदभावी, मारुती मदभावी, आप्पासाहेब पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पिरगोंडा पाटील यांचा मुलगा शिवकांत याने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या खूनप्रकरणी दहाजणांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)पवनचक्कीचा वाद दरम्यान, या घटनेमागे पवनचक्की कंपनीच्या रस्त्याचा वाद असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.
सिंदूरमध्ये शेतकऱ्याचा खून
By admin | Published: January 28, 2017 12:15 AM