सांगली : पाऊस नसल्यामुळे विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. द्राक्षांसह खरीप पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने पेड, मोराळे (ता. तासगाव) योजनेतून मोराळे, मांजर्डे परिसराला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या मारला होता. पाइपलाइनची गळती काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाने पेड, मोराळे योजनेतून पाणी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, टेंभू योजनेच्या अंतर्गत विसापूर टप्पा क्रमांक एक, भालेखडा टप्पा क्रमांक दोन, पेड, मोराळे योजनेतून पाइपलाइनद्वारे मोराळे, मांजर्डे, वाघजळे, पवार मळा, चोपडे वस्ती, बारा आंबा, मंडले वस्ती तलावात पाणी सोडण्याची गरज आहे. सध्या द्राक्षबागांसह खरीप हंगामातील पिके वाळत आहेत. म्हणून तातडीने जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, दत्तात्रय मोहिते, राजेंद्र मोहिते, अरुण मंडले, नामदेव पाटील, योगेश पाटील, विठ्ठल मोहिते, उद्धव मोहिते, अमृत राजमाने, दिलीप मोहिते, अजित पवार, गोरख चोपडे, अनिल माने, दत्तात्रय मोहिते आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
२ ऑक्टोबरला जनावरे, बायका-मुलांसहित मोर्चा : दिगंबर कांबळेतासगाव तालुक्यातील मोराळे, मांजर्डे परिसराला पाणी सोडले नाही तर दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनावरे, बायका-मुलांसहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घालणार आहे, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे.