सांगली : सध्या पेरणीसह शेतीतील इतर मशागतीची कामे सुरू आहेत. या कालावधीत पेरण्यात येणारे सोयाबीनची बियाणे दरवर्षी बदलाची आवश्यकता नाही. एकदा बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी स्वत:कडील चांगले बियाणे वापरावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
मास्तोळी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाणांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी.
कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन पेरणीविषयी देण्यात येत असलेल्या सूचनांचेही पालन करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना लाभ मिळेल असेही मास्तोळी यांनी सांगितले.