जत : उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. भगवंत दुंडाप्पा तेली-मेडीदार (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, उमदी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.भगवंत तेली यांची सहा एकर जिरायत शेतजमीन आहे. बॅँक आॅफ इंडियाच्या उमदीतील शाखेतून दोन लाखाचे पीककर्ज घेऊन त्यांनी एक एकर डाळिंब बाग केली आहे. मात्र कमी पावसामुळे बाग वाया गेली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी दोघा खासगी सावकारांकडून प्रत्येकी दोन लाखाचे कर्ज घेऊन शेतात चार कूपनलिका खोदल्या होत्या. तथापि, त्यांनाही पाणी लागले नाही. या चार लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात त्यांनी दोघा सावकारांना प्रत्येकी दोन एकर याप्रमाणे चार एकर शेतजमीन लिहून दिली आहे. डाळिंब बागेतून झालेले आर्थिक नुकसान आणि वाया गेलेल्या कूपनलिका यामुळे कर्जाची फेड कशी करायची, या विवंचनेत ते होते. त्यात त्यांनी बुधवारी रात्री आठ वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. घरातील लोकांना ते समजल्यानंतर त्यांनी भगवंत तेली यांना जतमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी प्रकृती गंभीर )बनल्यामुळे त्यांना सायंकाळी पाच वाजता मिरजेतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. भगवंत तेली यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला असून मेमधील तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली होती. (वार्ताहर)
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: March 02, 2017 11:42 PM