लोकमत न्यूज नेटवर्क
जत : मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे आठवडी बाजारपेठांसह जनावरांचे बाजारही बंद आहेत. त्यामुळे पशुधनाची खरेदी-विक्री बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे शेतीची कामे यांत्रिकी पद्धतीने करण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीला महत्त्व आले आहे. यामुळे बैलांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील जत व माडग्याळ येथील आठवडी पशुधन बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लाॅकडाऊन जाहीर केले होते. मागील तीन ते चार महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये जनावरांचा बाजार देखील बंद केला होता.
वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी बैलांच्या साहाय्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहेत. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद असल्याने सर्वसामान्य शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मशागतीसाठी बैलांची आवश्यकता असल्याने काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. जत तालुक्यामध्ये जून महिन्यात पावसाने हजेरी लावून बळिराजाला दिलासा दिला आहे. पावसामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे. यामुळे तालुक्यातील माडग्याळ व जत येथील पशुधनचा आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
चाैकट
सोशल मीडियाचा आधार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. यामुळे शेतकरी जनावरांची विक्री आता सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचा फोटो टाकून त्याखाली आपला मोबाईल नंबर दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करावयाची आहे, तो मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन करत आहे.