संख : जत तालुक्यात बेदाणा निर्मितीला पोषक वातावरणामुळे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती होते. चालू हंगामात उत्तम प्रतीचा बेदाणा तयार झाला आहे. मात्र, शीतगृहांची सोय नसल्याने तो सांगली, तासगाव येथे ठेवला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सौदे बंद असल्याने शेतकऱ्यांंची अडचण झाली आहे.
जत तालुक्यात द्राक्षाचे १० हजार ८७० एकर क्षेत्र आहे. बेदाण्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढला आहे. उमदी, बेळोंडगी, निगडी बुद्रुक, बालगाव, सुसलाद, हळ्ळी, सोनलगी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, संख, जालिहाळ बुद्रुक, कोंतेवबोबलाद या भागात बेदाणा निर्मिती केली जाते. माणिक चमन वाण, हिरवा रंग, साखरेचे प्रमाण अधिक, दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबी व फुगीरपणा ही येथील बेदाण्याची वैशिष्ट्ये आहेत. उष्ण व कोरड्या वातावरणामुळे बेदाणा लवकर सुकतो. त्याला रंग, चकाकी येते. लाॅकडाऊनपूर्वी बेदाण्याचा सरासरी १५० ते ३०० रुपये दर होता. कोरोनामुळे बेदाणा सौदे बंद आहेत.
सध्या बागांची खरड छाटणी केली आहे. काड्या तयार करण्यासाठी रासायनिक खत, सेंद्रिय खत, औषध यावर खर्च करावा लागतो. उधारीवर औषधासाठी २० ते २५ टक्के जादा दर लावतात. छाटणी, मशागतीला पैसे लागणार आहेत.
शेतकऱ्यांना कोल्ड स्टोअरेज व्यापाऱ्यांनी एकरी पन्नास हजार ते एक लाखापर्यंत उचल म्हणून रक्कम दिली आहे. त्याच्यावर दोन टक्के व्याज आकारणी केली जाते.
कोरोना काळात बेदाणा आरोग्यासाठी उत्तम ठरत असल्याने त्याला जास्त मागणी आहे. त्यासाठी ऑनलाईन सौदा किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून शीतगृहांवर पर्यायी सौदा काढणे गरजेचे आहे. असे सौदे करण्यासाठी काही व्यापारी तयार आहेत. परंतु, मोठ्या व्यापाऱ्यांचा विरोध आहे.
बेदाणा व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल
शीतगृहांवर काही निवडक व्यापाऱ्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा बेदाणा कमी दराने खरेदी करुन ठेवला आहे. हजारो टन बेदाण्याची साठवणूक केली आहे. हा साठा संपेपर्यंत शेतकऱ्यांचा बेदाणा सौदा काढण्यास विरोध आहे. मोठे मोजकेच व्यापारी ही खेळी करत आहेत. उचलीचे व्याज व शीतगृहाचे भाडे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे बेदाणा सौदे कोरोना नियम पाळून सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.
कोट
बेदाण्याचे दहा ते बारा बलाढ्य व्यापारी आहेत. लॉकडाऊनमुळे बेदाण्याला कमी दर देत आहेत. सौदे कोरोना नियम पाळून सुरु करावेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केली आहे.
- प्रवीण आवरादी,
द्राक्ष बागायतदार,
तालुकाप्रमुख, युवा सेना, जत