सांगली : सांगली जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखालील अकोले (जि. अहमदनगर) ते लोणी पायी मोर्चात सहभागी व्हावे असे अवाहन सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले.देशमुख म्हणाले, किसान सभेने गेल्या महिन्यात काढलेल्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चनंतर शासनाने देवस्थान जमिनींसंदर्भात कायद्याचे आश्वासन दिले होते. पण कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे २६ एप्रिलरोजी अकोल्यातून पायी मोर्चा काढला जाणार आहे. २८ एप्रिलरोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात जाईल. देवस्थान जमिनीसंदर्भात कायदा करेपर्यंत लोणीमध्येच ठिय्या राहील. ही लढाई आरपारची असेल. त्यामध्ये सांगलीसह राज्यभरातून देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.यावेळी सतपाल साळुंखे, जावेद मुलाणी, धनाजी पवार, शैलेश साळुंखे, बाळासाहेब गुरव, कृष्णदेव साळुंखे, महादेव यादव, माणिक तावदर, रमेश पाटील, शहाजीराव गुरव, सभेचे जिल्हा सचिव गुलाब मुलाणी आदी उपस्थित होते.
इनाम जमीन कसणारे शेतकरी मारणार महसूल मंत्र्यांच्या गावात ठिय्या, २६ एप्रिलपासून अकोला ते लोणी पायी मोर्चा
By संतोष भिसे | Published: April 18, 2023 7:24 PM