सांगली : पहाटेच्या मंद वाऱ्यासह पंडित शौनक अभिषेकींच्या आल्हाददायी स्वरांच्या लहरी... वाद्यांच्या साथीने भरलेला रंग आणि त्यात तल्लीन होऊन आस्वाद घेणारे दर्दी रसिक, अशा वातावरणात रविवारी सांगलीत प्रात:कालीन संगीत मैफिल सजली. स्वरवसंत ट्रस्टतर्फे सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या प्रात:कालीन रागांच्या या मैफिलीला सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला.राग कोमल रिषभ आसावरीने पंडित अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. झुमरा तालातील ‘राम जय जय’ या बंदिशीतून त्यांनी या अनवट रागाचे पैलू उलगडून दाखवले. त्यानंतर द्रुत तीनतालातील ‘कलना परत मोहे’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. श्रोत्यांच्या मनाचा हळूहळू ताबा घेताना त्यांनी पुढे ‘खट तोडी’ हा आणखी एक दुर्मिळपणे गायिला जाणारा राग सादर केला. तीनतालातील बंदिशीनंतर पंडित बबनराव हळदणकर यांचा एक तराना त्यांनी अतिशय ताकदीने मांडला. त्यास श्रोत्यांनी दाद दिली. गाण्याला पूरक अशी तबलासाथ महेश देसाई यांनी, तर रंगत वाढवणारी संवादिनीची साथ मिलिंद कुलकर्णी यांनी केली.तत्पूर्वी आध्यात्मिक गुरू अण्णामहाराज केळकर, ज्येष्ठ कीर्तनकार नानाजी काणे, श्रीमती उषा कुत्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बाळासाहेब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर उर्मिला ताम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले. शास्त्रीय संगीतासाठी मनापासून काम करू इच्छिणाऱ्या रसिकांना या कामात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आभार सुवर्णा सूर्यवंशी यांनी मानले. (प्रतिनिधी)
शौनक अभिषेकी यांच्या स्वराविष्कारात रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: May 01, 2017 12:35 AM