सांगली : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खूनप्रकरणी प्रमुख संशयित उमेश सावंत याच्या अटकेसाठी ताड कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले. सावंतला अटक होईपर्यंत उपोषण सुरुच राहील अशी माहिती आंदोलकांनी दिली.विजय ताडे यांचे भाऊ विक्रम यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ३ जुलैरोजी निवेदन दिले होते. सावंत याला १७ जुलैपर्यंत अटक झाली नाही, तर उपोषणाचा इशारा दिला होता. यादरम्यान, अटकेची कार्यवाही न झाल्याने त्यांनी परिवार व मित्रांसह उपोषण सुरु केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, विजय ताड यांचा खून होईन चार महिने झाले, तरीही मुख्य संशयित सावंतला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. खून प्रकरणातील चार संशयितांना तातडीने अटक केली, सावंतला अटक करण्यात मात्र पोलिस उदासीनता दाखवत आहेत. पोलिस योग्य कार्यवाही करतील या अपेक्षेने आम्ही विश्वास ठेवला, पण अवहेलनाच करण्यात आली. आमच्या कुटुंबावर अन्याय केला.विक्रम ताड म्हणाले, सावंतच्या अटकेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना वारंवार भेटलो, पण त्यांच्याकडून तीच ती उत्तरे मिळत आहेत. अटकेच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे आमची सहनशीलता संपली आहे.आंदोलनात छाया ताड, वैभव ताड यांच्यासह अक्षय शिंगारे, सौरभ खराडे, किरण शिंदे, अनिल पारसे, योगेश पाटील, शिवाजी कोडोलीकर, संतोष भोसले, रघुनाथ भोसले, सचिन शिंदे, शरद भोसले, निलेश भोसले, सागर शितोळे आदी सहभागी झाले आहेत.
उमेश सावंत नातेवाईकांच्या संपर्कातविक्रम ताड यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुख्य संशयित उमेश सावंत नातेवाईकांच्या संपर्कात आहे, पण पोलिस नातेवाईकांवर दबावतंत्राचा वापर करत नाहीत. सावंतला पकडण्याकामी कोणताही कौशल्यपूर्ण तपास झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.