सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याप्रश्नी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्यावतीने शुक्रवार २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय विभुते यांनी दिली.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २७ टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकेतील ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्वही धोक्यात आले आहे. त्यासाठी शासनाने इम्पेरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करणे आवश्यक होते. शासनाने हा डाटा सादर करून फेरविचार याचिकेच्या माध्यमातून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून द्यावे, अशी मागणी करण्यासाठी व याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेली समाजाच्यावतीने महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सांगलीत २ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत उपोषण करण्यात येईल, असे विभुते यांनी म्हटले आहे.