खरं तर शिराळ्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अगदी चंद्र-सूर्य तळपावेत तशी दोन नावं अभिमानाने तळपत होती, ती म्हणजे अप्पांचे वडील स्व. आनंदराव तात्या आणि चुलते स्व. विश्वासराव भाऊ. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून तात्या आणि भाऊंची राजकीय कारकीर्द आकाराला येत होती. राम-लक्ष्मणाप्रमाणे हे दोन्ही बंधू शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत होते. झगडत होते. स्वातंत्र्य मिळाले; पण इतिहासाच्या तेजोमय मशाली आपल्या काळजात तेवत ठेवणारा हा तालुका त्याच्या दुर्गमतेमुळे दुर्लक्षितच राहिला. उपेक्षेचे शाप सलत्या उरात घेऊन येणारा दिवस ढकलू लागला. आजूबाजूच्या तालुक्याची प्रगती जोमाने झाली; पण शिराळा तालुक्याकडे पाहताना अगदी अंगावर काटा सरसरून यावा, अशीच उदासीन परिस्थिती कायम राहिली. रस्ते, वीज नाही, वारणाकाठ वगळता पिण्यास आणि शेतीस पाणी नाही, शिक्षण आरोग्याच्या सोयी नाहीत, अशा आदिम अवस्थेत जणू जगत होता इथला माणूस. ही परिस्थिती बदलण्यासाठी झगडत होते, आनंदराव तात्या आणि विश्वासराव भाऊ. सारा तालुका त्यांच्या धडपडीकडे आशेने पाहत होता. इथल्या कृषिक्रांतीला पोषक बळ देण्यासाठी आनंदराव तात्या आणि विश्वासराव भाऊंनी इथे शिवभवानी साखर कारखान्याची स्थापना केली. एक मनोरम स्वप्न साकार झालं; पण दैवाचा खेळ निराळा. हिरवाईचा हा वेल प्रगतीच्या आभाळात सरसावत असतानाच विश्वासराव भाऊंचं अपघाती निधन झालं आणि जणू या प्रगतीच्या चाकांनाच खीळ बसली. आनंदराव तात्या एकाकी पडले.
या काळात आनंदराव तात्यांचे सुपुत्र फत्तेसिंगराव नाईक अप्पा चिखली गावचे सरपंच होते; पण राजकारणी नेता या बिरुदावलीपेक्षा सर्वसामान्यांना सोबत घेत झगडणारा कार्यकर्ता हाच अप्पांचा पिंड लोकमनात रुजला होता. विश्वासराव भाऊंच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि आनंदराव तात्यांच्या वसा-वारसा पुढे चालवण्यासाठी आता कोण पुढे येणार? अशा काळात हे शिवधनुष्य अप्पांनी आपल्या खांद्यावर घेतले. खरं तर भविष्याच्या उज्ज्वल पिकासाठी या दुर्गम मातीत तात्या आणि भाऊंनी आपल्या तितक्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने नांगरट केलीच होती, तरीही या मातीतले काटेकुटे वेचणे बाकी होते. पसरलेले दगडगोटे गोळा करून या मातीची मशागत साधणे, हे आता अप्पांचे ध्येय होते. या अशा वाटेवर पाय ठेवून अप्पांनी साखर कारखान्याचे चेअरमन पद स्वीकारले. तो काळ असा होता की, राजकारण गेलं चुलीत; पण या कारखान्यावर अवलंबून असणारा माझा शेतकरी जगला पाहिजे, कामगारांच्या चुली पेटल्या पाहिजेत याच तळमळीने अप्पांनी अक्षरश: पायाला पाने बांधून शासनदरबारी खेटे घालणं सुरू केलं. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सरुडकर यांना सोबत घेऊन फत्तेसिंग अप्पांनी मुंबईत मंत्रिमंडळात भेटीगाठी घेऊन शिराळा तालुक्याची व्यथा शासनदरबारी मांडली. त्यांची तगमग, बळीराजासाठी चाललेल्या धडपडीला अखेर यश आले. कारखान्यास तत्कालीन सहकारमंत्री विलासराव देशमुख यांनी भरीव निधी मिळवून दिला. बंद पडलेल्या चक्रांना आता आकांक्षांचे वंगण लाभले. चक्रे पुन्हा सुरू झाली. प्रगतीच्या वाटेवर स्वप्नांची गाडी भरधाव धावू लागली.
शिवभवानी साखर कारखाना आता विश्वासराव भाऊंचे नाव घेऊन अभिमानाने बाळसं धरू लागला. विश्वासराव भाऊंच्या स्मृतींचा हा अमर दीपस्तंभ. विश्वास सहकारी साखर कारखाना. ही फक्त सुरुवात होती. कारखाना सुरू तर झाला; पण या कारखान्याला सदृढ बनवायचं तर भरघोस उसाचं खाद्य त्याला द्यावं लागणार होतं आणि असा भरघोस ऊस इथं पिकवायचा तर पाण्याची मुबलकता या तालुक्याला हवी होती. खरं तर वारणा, मोरणा अशा नद्या या तालुक्याच्या धमन्या बनून वाहत होत्या. मात्र, पाणी उशाला नि कोरड घशाला, अशी स्थिती इथल्या शेतकऱ्याची होती. वारणेच्या पाण्यावर शिराळ्याच्या जनतेचा पहिला हक्क आहे आणि म्हणूनच अप्पांनी १९८२ मध्ये पाणी परिषद घेऊन शिराळा उत्तर भागामध्ये जनजागृती सुरू केली होती. इथेच अप्पांच्या महत्त्वाकांक्षेतून वाकुर्डे पाणी योजनेचा जन्म झाला होता. कारखाना सुरू झाल्यानंतर अप्पांनी त्या प्रयत्नांना पुन्हा बळकटी दिली. वारणा प्रकल्पातील डाव्या कालव्यातून शिराळ्याच्या उत्तर भागाकरिता दोन ते तीन ठिकाणांहून पाणी उचलून अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली कसे येईल ते पाहावे, असं पत्र अप्पांनी माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांना पाठवलं होतं. वारणा नदीतून फक्त आठ टक्के पाणी शिराळा तालुक्याला मिळत होतं. त्याऐवजी वीस टक्के पाणी मिळावं, हा अप्पांचा पाठपुरावा होता. शिराळा उत्तर भागाला पाणी मिळावे यासाठी पाणी योजनेचा आराखडा मांडला होता. या योजनेबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरची भाकरी बांधून अप्पा उत्तर भागात रान शिवारातून फिरत होते. एका झाडाखाली भाकरी खायला बसले असता अप्पांनी तिथल्या शेतकऱ्याकडे पाणी मागितले. तेव्हा त्या शेतकऱ्याने अगदी अर्ध्या तासाची पायपीट करून पाणी आणून दिले. त्यावरून अप्पांनी या विभागाची पाण्याची गरज व परिस्थितीची तीव्रता जाणली. बळीराजानं जगावं कसं? याचसाठी वाकुर्डे योजनेचा अट्टाहास मांडला होता.
दरम्यान, स्व. अप्पांनी शेती तंत्रज्ञानाची आधुनिक माहिती घेण्यासाठी परदेश दौरा केला. पाण्याशिवाय शेती पिकणार कशी हा विचार डोक्यात घेऊन शिराळा तालुक्यासाठी २२ सिंचन योजना आणि शाहूवाडी तालुक्यासाठी १३ सिंचन योजना तयार केल्या. त्यातून मोठ्या प्रमाण शेती पाण्याखाली आली. उसाची शेतं पिकू लागली. त्यामुळे साखर उतारा नोंदीमध्ये विश्वास साखर कारखाना अगदी राष्ट्रीय स्तरावर विक्रमी नोंद देऊ लागला. अगदी मानाची राज्य व राष्ट्रीय पारितोषिके जिंकली. आर्थिक सुबत्ता आली. सोबत शैक्षणिक व सांस्कृतिक सुबत्ता यावी यासाठीही अप्पांची धडपड सुरू झाली. १९९१ साली अप्पांनी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ज्यांच्या अनेक पिढ्या अज्ञानाच्या अंधारात जगल्या त्या सर्वसामान्यांच्या घर-झोपड्यांमध्ये आता ज्ञानाचे अक्षरदिवे तेवू लागले. याच दिव्यांसोबत घराघरात प्रगतशील विजेचे दिवेही जळत होतेच. ज्या तालुक्याने युगानुयुगे अंधार भोगला, त्या तालुक्याला पूर्णदाबाने व मुबलक वीज मिळावी यासाठी अप्पांनी रिळे (ता. शिराळा) येथे स्वत: जमीन खरेदी करून वीज मंडळास ती जमीन मोफत दिली. आज २२ के.व्ही. वीज केंद्र त्या जागेवर उभा आहे. इथे नव्या उमेदीची पायाभरणी नव्या नवलाईच्या झगमगाटात झाली. १९८९ साली अप्पा राज्य विद्युत मंडळावर सदस्यपदी निवडले गेले. या धवल कर्तृत्वाचा प्रकाश अगदी दिल्ली दरबारी पोहोचला आणि १९ ऑगस्ट १९८५ मध्ये राजीव गांधी व १९ नोव्हेंबर १९९५ रोजी इंदिरा गांधी पुरस्काराने अप्पांना सन्मानित करण्यात आले. एकूणच आप्पांच्या आयुष्यात भारताचे उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे प्रेम, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांची कृपादृष्टी, लोकनेते स्व. राजारामबापू पाटील, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी मंत्री स्व. पतंगराव कदम, विद्यमान जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचे सहकार्य व कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर (दादा) यांची बहुमोल साथ लाभली.
आयुष्याच्या उत्तरार्धात फत्तेसिंग अप्पांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करावा लागला. मात्र, सह्याद्रीच्या कणखर कातळात राहणारा हा पिंड अशा आजाराला शरण जाणार नव्हता. जनतेचं अलोट प्रेम आणि कार्यकर्त्यांचे उत्तुंग पाठबळ, या जोरावर अप्पांनी कित्येक वर्षे या आजाराला रोखून धरलं. सर्वसामान्य जनतेसोबत अप्पांचं नातं ‘अतूट’ असंच होत. शांत, संयमी, धुरंधर राजकारणी अशी त्यांची ओळख! नवनिर्मितीचा ध्यास आणि दूरगामी दृष्टी ही अप्पांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. खऱ्या अर्थाने, अप्पा दयेचा सागर होते. जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा, नियतीचा नियम. शिराळ्याच्या मातीतं जन्मलेला हा साधा, स्वच्छ समाजकारणी लोकनेता बुधवार, २२ जानेवारी २००३ रोजी या मातीच्या कुशीतचं विसावला! पण समाजात अप्पा त्यांच्या कार्यामुळे लाेकस्मृतीत कायम जिवंत राहतील.
जनसामान्यांचे अप्पा गेले. अर्थात, लौकिक अर्थाने गेले... पण तो अलौकिकाचा वारसा इथं चिरंजीव आहे. अप्पांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. अनेक उपसा जनसिंचन योजना, शिराळ्याजवळील मोरणा मध्यम प्रकल्प मागणी, उभारणी व त्याच्या सांडव्यात कारखान्याच्या माध्यमातून भिंत बांधणे, नागरी पतसंस्थांची निर्मिती, महिला सहकारी संस्था, गावोगावच्या अनेक सेवा सोसायट्या, प्रचिती सहकारी कृषी प्रक्रिया संस्था, महाविद्यालय, अनेक माध्यमिक शाळा, निवासी विद्यालय ही अप्पांच्या कर्तृत्वाचे आभाळ आहे. प्रचितगडाशी असणारा ऐतिहासिक वारसा जपताना अप्पांनी प्रचिती सहकारी कृषी प्रक्रिया संस्थेची स्थापन केली. सहकाराचे आणि शिक्षणाचे मोठे जाळे निर्माण केले. सहकारी दूध संघ, आपला बझारचे जाळे, विश्वास उद्योग समूहाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले. विश्वास शिक्षण समूहाचा वटवृक्ष होताना इथे शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन, साहित्यिकांच्या छायेत ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या कक्षा वाढवण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा, कुस्ती मैदान, पहिलवानांचे संगोपन, अशा प्रगत उपक्रमांचे बीजारोपण अप्पांनी इथं केले आहे.
ज्या तळमळीने फत्तेसिंग अप्पांनी डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणले, येथील भौगोलिक परिस्थिती जाणली आणि ते प्रश्न तळमळीने सोडविण्याचा प्रयत्न केला. येथील शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची दुःखे आपली मानून सोडविण्यासाठी अपार कष्ट वेचले. वारणा, मोरणा व कडवी नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक व शैक्षणिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले. आज या सर्व गोष्टींचे त्याच तोलामोलाने सातत्य ठेवण्याचा किंबहुना सातत्याने त्यात वाढ करण्याचा प्रयास अप्पांच्या वारसदारांनी कायम ठेवला आहे. अप्पा आज आपल्यात नाहीत; पण अप्पांनी अथक परिश्रमाने उभा केलेली हिरवीगारं शिवारं व शेतकऱ्यांचे सुखी संसार अप्पांच्या कार्याची साक्ष देत आहेत. जसं शांत, संयमी व धुरंधर असे फत्तेसिंग अप्पांचे नेतृत्व होते. ज्या कौशल्याने त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायट्या, बाजार समिती आदी सहकारी संस्थांवर सत्तेचा झेंडा फडकवला अगदी त्याच कसोशीने, त्याच प्रेरणेने अप्पांच्या विचारांचे वारसदार इथे सामाजिक सेवेची पालखी वाहताहेत. अप्पांच्या कर्तृत्व स्मारकांना जिवाभावानं जपताहेत, हेच अप्पांचे चिरंजीवित्व नव्हे काय?
आज अप्पा आपल्यात शरीराने नाहीत; पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग, जलसिंचन अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी केलेले अलौकिक कार्य आपल्या सर्वांनाच सदैव प्रेरणा देत राहील. अशा या महान, कर्तृत्ववान चारित्र्यसंपन्न लोकसेवकाला म्हणजेच हरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांच्या स्मृतिदिनी व पूर्णाकृती पुतळा अनावरण निमित्ताने विनम्र अभिवादन..!
चौकट :
स्व. लोकनेते फत्तेसिंग अप्पा आपणावर एकच जबाबदारी देऊन गेलेतं, की जो त्यांच्या संपूर्ण जीवनाचा, कार्याचा मूळ उद्देश होता. ज्याच्यासाठी त्यांनी उभं आयुष्य झिजवलं. माणसं जोडली. माणसं कमावली, त्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यांतील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकरी सुखी करणे. अप्पांनी निर्माण केलेल्या पायवाटेचा आता हमरस्ता झाला आहे. प्रगतीची कवाडे उघडली आहेत; पण अजूनही काही ठिकाणी ओलावा निर्माण झालेला नाही. त्या मातीत ओलावा निर्माण करून बीजास अंकुर फुलल्यानंतर अप्पांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे जाईल. त्याचसाठी शिराळा अन् वाळवा तालुक्याला शंभर टक्के पाण्याने समृद्ध करायचे आहे. हे स्वप्न तेव्हाच पूर्णत्वाला जाईल...संपूर्ण वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्ण झाल्यावर... ही जबाबदारी आता मा. जयंतराव पाटील साहेब व आमदार मानसिंगभाऊ यांच्यावर.
............................................
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या फोटोसह चौकट :
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पांचे चिरंजीव विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक समाजकारण, राजकारण, उद्योग आणि व्यवसायात नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्त्व. अप्पांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालताहेत. विश्वास कारखान्यात आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प, माती व पाणी परीक्षणाची सोय, ऊस बियाणे प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, जैविक द्रवरूप खत प्रकल्प, कार्बन डायऑक्साइड बॉटलिंग प्रकल्प, असे अनेक उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्यात झाला आहे. आमदार मानसिंगभाऊ एवढ्यावरच न थांबता तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विराज उद्योग समूहाची उभारणी केली आहे. त्यामध्येही पशुखाद्य निर्मिती प्रकल्प, देशी व विदेशी मद्यनिर्मिती प्रकल्प, कार्बन डायऑक्साईड बॉटलिंग प्रकल्प, पाम रिफायनरी प्रकल्प, विराज हायटेक विविंग प्रकल्प आदींची उभारणी करून बेरोजगार महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत लोकप्रतिनिधी असताना त्यांनी स्व. अप्पांचे स्वप्न असणाऱ्या वाकुर्डे योजनेच्या शिराळा तालुक्यातील कामांसाठी आघाडी सरकारकडून मोठा निधी मिळवून बहुतांश कामे मार्गी लावली. वारणेचं पाणी उत्तर भागातील करंमजाई तलावात व तेथून पुढे मोरणा धरणात व धरणाखालील पाणलोट क्षेत्रातील हजारो एकर शेतीला दिले आहे. याशिवाय बऱ्याच वर्षांची मागणी असलेला गिरजवडे जलसंधारण प्रकल्प पूर्णत्वास नेऊन या भागाचा विकास व पाण्याची समस्या सोडविली आहे. त्या कालावधीत ५१७ कोटी रुपयांची कामे करून इतिहास रचला आहे. आता पुन्हा शिराळा, वाळव्यातील जनतेने त्यांना आमदार बनवले आहे. त्यामुळे राज्यातील महाआघाडी सरकार व जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने ते वाकुर्डे बु. योजना पूर्ण करतील यात तिळमात्र शंका नाही. याशिवाय त्यांनी शिराळा तालुक्याचे नाव पर्यटनाच्या दृष्टीने भारताच्या नकाशावर अधिक गडद करण्याचा निश्चय केला आहे. येथील चांदोली धरण, गुढे पाचगणी थंड हवेचे पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान व छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंजेब बादशहाकडे घेऊन जात असना शिराळ्यातील ऐतिहासिक तोरणा किल्ल्यावर सोडविण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केला. त्या तोरणा किल्ल्याचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. वाडी-वस्तीपर्यंत पोहचून ते सामान्यांची दुःखे, अडचणी जाणून घेताना दिसत आहेत. येथील शेवटच्या टोकावरील माणूस प्रगतीच्या प्रवाहात आणणे हा एकमेव उद्देश ठेवून ते काम करत आहेत. किंबहुना स्व. फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत, असेच म्हणावे लागेल.