विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथे शेतममिनीच्या वादातून सख्खा भाऊ व पुतण्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
या हल्ल्यात भाऊ शिवाजी धोंडीराम पवार व त्यांचा मुलगा जयकुमार शिवाजी पवार (दोघेही रा. जाधवनगर, ता. खानापूर) हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी संशयित धनाजी धोंडीराम पवार, उषा धनाजी पवार व धीरज धनाजी पवार (सर्व रा. जाधवनगर) या तिघांविरुध्द विटा पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
जाधवनगर येथील संशयित धनाजी पवार व भाऊ शिवाजी पवार यांच्यात गट नं. ६२९ च्या शेतजमिनीबाबत तक्रार सुरू असून, त्याचा न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयाने या शेतजमिनीबाबत स्टे ऑर्डर केली आहे. त्यामुळे ही शेतजमीन वादग्रस्त आहे. असे असताना न्यायालयाचा मनाई हुकूम डावलून शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संशयित धनाजी पवार, उषा पवार व धीरज पवार हे वादग्रस्त शेतजमिनीची नांगरट करण्यास गेले होते. याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पवार व त्यांचा मुलगा जयकुमार हे दोघेजण घटनास्थळी गेले.
यावेळी त्यांच्यात वाद झाला. धनाजी पवार यांनी शिवाजी यांना शिवीगाळ करीत हातातील कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात शिवाजी यांच्या उजव्या हाताचे मनगट तुटले. शिवाजी यांचा मुलगा जयकुमार हा भांडण सोडविण्यास गेल्यानंतर त्याच्याही पाठीत कोयत्याने दोन ते तीन वार करून त्यालाही गंभीर जखमी केले. या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले. जखमी वडील व मुलावर सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जयकुमार पवार यांनी विटा पोलिसांत संशयित धनाजी, मुलगा धीरज व उषा पवार या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे पुढील तपास करीत आहेत.