शिराळा : शिराळा - कोकरूड रस्त्यावर बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील बसस्थानकाजवळ भरधाव माेटारीने दुचाकीला धडक दिल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला. माेटारीच्या जाेरदार धडकेत दुचाकीवरील तृप्ती आत्माराम पवार (वय २८, रा. इस्लामपूर) जागीच ठार झाली, तर तिचे वडील आत्माराम विष्णू पवार (वय ६०, रा. इस्लामपूर) यांचा कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात काल, रविवारी (दि. २८) दुपारी घडला.साेलापूर येथील डॉ. अल्पेश शिवाजी खडतरे (वय ३८, रा. विजापूर रोड) हे आपल्या कुटुंबासह माेटारीतून क्र. (एमएच १३, बीएन २८१६) रत्नागिरीहून सोलापूरकडे निघाले हाेते. तर आत्माराम पवार व त्यांची मुलगी तृप्ती घरगुती कामासाठी दुचाकीवरून क्र. (एमएच १०, एई ३८०९) इस्लामपूरहून कोकरूडला निघाले होते.दरम्यान, बिऊर-शांतीनगर येथील बसस्थानकापासून काही अंतरावर दाेन्ही वाहनांची समाेरासमाेर भीषण धडक झाली. यामध्ये तृप्ती ही दुचाकीवरून उडून रस्त्यावर फेकली गेली तर आत्माराम पवार हे माेटारीवर जाऊन आदळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. आत्माराम यांनाही डोक्याला दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्यासह नातेवाईकांनी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताबाबत धैर्यशील पाटील यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक अविनाश वाडेकर करत आहेत.उच्चशिक्षित तृप्ती ही पुणे येथील खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत हाेती. सुटी असल्याने ती इस्लामपूरला आली हाेती. आत्माराम हे प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. शिराळा पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली आहे.एक अपघात टळला पण क्षणार्धात दुसरा झालाच..या अपघातापूर्वी खडतरे यांच्या माेटारीची दुसऱ्या एका दुचाकीशी धडक होता होता वाचली. यानंतर काही क्षणातच त्यांच्या माेटारीची आत्माराम पवार यांच्या दुचाकीला धडक बसली.अपघाताची माहिती मिळताच मृत तृप्तीचा भाऊ अनिकेत उपजिल्हा रुग्णालयात आला. या ठिकाणी एका खोलीत तृप्तीचा मृतदेह ठेवला होता. मित्रांनी त्याला तृप्तीचा मृत्यू झाल्याचे न सांगता तिला उपचारासाठी कऱ्हाडला नेल्याचे सांगितले. तसेच वडील आत्माराम यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे लांबून दाखविले. यावेळी अनिकेतला आवरणे उपस्थितांना अवघड झाले होते.
Sangli News: भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 1:53 PM