सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र हरी पाटील (रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) यांचे संचालक पद मंगळवारी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी रद्द केले. मुलगा विठ्ठल पाटील हे बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करीत असल्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे.संचालक रामचंद्र पाटील यांचा मुलगा विठ्ठल पाटील हे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करीत आहेत. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ व नियम १९६७ व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या नियम २०१७ मधील नियम क्र. १० (३) मधील तरतुदीनुसार मला अधिकार आहेत. तसेच दोन्ही वकिलांच्या बाजू जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार सांगली बाजार समितीचे संचालक रामचंद्र हरी पाटील आहेत. संचालक पदाचा लाभ घेत असताना त्याच संस्थेमध्ये त्यांचा मुलगा विठ्ठल पाटील कायमस्वरूपी नोकरीस आहेत. म्हणूनच रामचंद्र पाटील हे संचालक मंडळावर संचालक म्हणून राहणेस नियम १० (एच) व नियम १०(३) अन्वये अपात्र ठरत आहेत. तसेच त्यांचे संचालक पदही मंगळवारपासूनच रद्द करण्यात येत आहे. रामचंद्र पाटील हे कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्जवाटप संस्था शेतकरी मतदारसंघातून सांगली बाजार समितीवर निवडून आले होते.
मागील निवडणुकीत अर्जच अपात्ररामचंद्र पाटील यांनी मागील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता; पण त्यावेळी अर्ज भरतानाच सांगली बाजार समितीत मुलगा विठ्ठल पाटील नोकरीस असल्याची तक्रार झाली होती. या तक्रारीनुसार त्यांचा अर्ज अपात्र ठरविला होता. पण, या निवडणुकीत अर्ज भरताना कुणीच हरकत घेतली नव्हती. म्हणून ते संचालक झाले होते. निवडणुकीनंतर तक्रारदार आबासाहेब चंदर खांडेकर यांनी दि. ३१ मे २०२४ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे रामचंद्र पाटील यांचे संचालक पद रद्दसाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांचे संचालक पद रद्द झाले.