सचिन लाड ल्ल सांगली गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या नदाफ तब्बल साडेचार वर्षांनंतर कारागृहातून बाहेर आल्याने त्याच्या साथीदारांनी संजयनगरमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन म्हमद्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांच्या हालचालीवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीकडून गंभीर गुन्हेगारी कारवाया होण्याची पोलिसांना भीती आहे. दोन खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजवणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला म्हमद्या नदाफ पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सातत्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने तो पोलिसांना नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. २००९ मध्ये त्याने साथीदारांच्या मदतीने वडर कॉलनीतील दुर्गेश पवार या तरुणाचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर खुनीहल्ला केला होता. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला होता. या घटनेनंतर म्हमद्या फरार झाला होता. महिन्यानंतर कर्नाटकात त्याला पकडण्यात यश आले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता. २०११ मध्ये तो कारागृहात दुहेरी खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, ‘पॅरोल’वर बाहेर आलेला गुंड विजय पवार याचा माळी गल्लीजवळ निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात म्हमद्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गेश पवार याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना म्हमद्याला सांगलीला न्यायालयात आणले जात असे. एक-दोन वेळा त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली होती, तसेच साक्षीदारालाही दमदाटी केली होती. दुर्गेशवरील हल्ल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. ही शिक्षा त्याने भोगून पूर्ण केली होती. परंतु अन्य गुन्ह्यात तो कोठडीतच होता. नुकताच तो कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. संजयनगरमध्ये त्याचे आगमन होताच त्याच्या साथीदारांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. या जल्लोषात कोण-कोण पुढे होते, याची माहिती काढण्याचे आदेश सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस गेले चार दिवस या साथीदारांचा शोध घेत आहेत. गेल्या साडेचार वर्षात विजय पवारचा खून व दुर्गेश पवार याच्यावर खुनीहल्ला हे दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने, म्हमद्यासह त्याच्या साथीदारांकडून गुन्हेगारी कारवाया सुरू राहण्याची भीती सांगली पोलिसांना आहे. यामुळेच त्यांच्या हालचालीवर पोलिसांकडून ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे.
गुंड म्हमद्या नदाफसह टोळीवर ‘वॉच’ सुटकेनंतर जल्लोष : संजयनगरात गुन्हेगारी कारवायांची भीती
By admin | Published: May 16, 2014 12:09 AM