लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक गावांत महापुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. वाळवा तालुक्यात नागरिकांच्यावर कोरोनाचे संकट असताना अचानक महापुराचे संकट आल्याने पुन्हा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत घाबरु नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत पूरग्रस्त नागरिकांना धीर व आधार दिला.
दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराच्या पाण्याने वेढले आणि नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. महापुराचे नैसर्गिक संकट बघता बघता आले. यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील संकटाचे सावट दाट झाले आहे. इस्लामपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील अनेक हाॅल पूरग्रस्त नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले. यामुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.
पाटील यांनी मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, शिरगांव, शिगाव, कारंदवाडी व मिरज तालुक्यातील दुधगाव, कसबे डिग्रज गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, प्रवीण माने उपस्थित होते.