सांगली : सांगली व मिरज शहरातील भुयारी गटार योजनेचे (ड्रेनेज) काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ठेकेदाराने बंद ठेवले आहे. याबाबत बुधवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराने काम सुरू केल्याशिवाय त्याच्या मुदतवाढीवर निर्णय घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना सभापती संतोष पाटील यांनी प्रशासनाला दिली. स्थायी समिती सभेत नगरसेवक दिलीप पाटील, हारुण शिकलगार, शिवाजी दुर्वे, अलका पवार या सदस्यांनी ड्रेनेज कामाचा मुद्दा उपस्थित केला. ठेकेदाराने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काम बंद ठेवले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. जाधव यांनी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ही फाईल प्रलंबित आहे, त्यामुळे त्याने काम बंद ठेवल्याचा खुलासा केला. प्रशासनाच्या उत्तरावर सभापती संतोष पाटील यांनी संताप व्यक्त केला. मुदतवाढ व काम सुरू ठेवणे हे दोन्ही विषय वेगळे आहेत. ठेकेदाराने मध्यंतरी आठ दिवसांत काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्याने काम सुरू केल्याशिवाय मुदतवाढीवर चर्चा होणार नाही, असे सुनावले. गुंठेवारीचा निधी काही सदस्य पळवापळवी करतात, असा आरोपही सदस्यांनी केला. ज्या भागात गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रशमन शुल्क व विकास निधी जमा झालेला नाही, तिथेच कामे होत आहे. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात जादा निधी खर्च होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर सभापतींनी सुमारे दोन कोटींच्या कामांच्या फायली थांबविण्याचे आदेश लेखा विभागाला दिले. गुंठेवारी निधीचे समान वाटप सदस्यांत केले जाईल. सध्या कोणत्या प्रभागात किती निधी खर्च झाला, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विस्तारित भागात निधी खर्च करण्यास प्राधान्य देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विश्रामबाग परिसरात चोवीस तास पाणी योजनेतील मीटर हवेवर फिरत असल्याची तक्रार नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केली. त्यामुळे अडीच हजार नागरिकांनी पाण्याची बिलेच भरलेली नाहीत. आठ दिवसांत अहवाल देऊन बिलांची दुरुस्ती करून वसूल करण्याची सूचनाही सभापतींनी केली. (प्रतिनिधी)...तर दुसरा तलाव झाला असता!मिरजेतील गणेश तलावात सौरऊर्जेवरील दिवे बसविण्यात आले आहेत. सध्या २० दिवे बंद असून, त्यातील बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे गणेश तलावातील दिवे इलेक्ट्रिकवर सुरू करावेत, अशी मागणी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी केली. त्यावर इतर सदस्यांनी या तलावावर आतापर्यंत किती खर्च झाला, असा प्रतिप्रश्न केला. गणेश तलावावरील खर्चात दुसरा तलाव तयार झाला असता, अशी टिप्पणीही काही सदस्यांनी सभेत केली.
ड्रेनेज ठेकेदाराबद्दल स्थायी समितीत संताप
By admin | Published: October 28, 2015 11:14 PM