वाटेगाव परिसरातील म्हातारा डोंगरावरील झाडाझुडपांना अडकवलेल्या भांड्यांमध्ये धान्य व पाणी ठेवताना युवक.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मे महिन्याची चाहूल लागताच डोंगर कपारीतील ओढे, ओहोळ यांसारखे निसर्गनिर्मित जलस्रोत आटले आहेत; मात्र पोट भरण्यासाठी व तहान भागवण्यासाठी रानावनातील पक्ष्यांची धडपड सुरूच आहे. या मुक्या जीवांना पसाभर धान्य व घोटभर पाण्याची आवश्यकता असते. पक्ष्यांच्या या जगण्याच्या धडपडीला एक मदत म्हणून वाटेगावच्या ज्योतिर्लिंग नगरमधील शिवराय ग्रुपने पक्षी वाचवा अभियान सुरू केले आहे.
शिवराय ग्रुपच्या सुनील शेटे, सुशांत माने, प्रशांत माने, तुषार माने, सौरभ माने, परशुराम साळुंखे, हर्षद माने व ग्रुपमधील युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चातून पक्ष्यांना चारा, पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने खाद्यतेलाचे रिकामे डबे, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या एकत्र करून त्यांना वेगवेगळे आकार देऊन म्हातारा डोंगरावरती झाडांना, झुडपांना दोरीच्या साह्याने बांधून त्यामध्ये गहू, तांदूळ, मका, ज्वारी, नाचणी, मूग, तूर, हरभरा, पाणी ठेवून पक्ष्यांच्यासाठी चारा व पाण्याची सोय केलेली आहे.
हे काम ग्रुपमधील छोटे-मोठे कार्यकर्ते रोज सकाळी किंवा सायंकाळी आपल्या घरातून धान्य व पाण्याच्या बॉटल भरून घेऊन म्हातारा डोंगर पठारावरती व्यायामाला जाताना घेऊन जातात व झाडाला बांधलेल्या भांड्यांमधील पाणी व धान्य बदलत असतात. हा त्यांचा रोजचा नित्यक्रम आहे. डोंगर माथ्यावरील वन्यजीवांसाठी शिवराय ग्रुप आधार बनले आहे.