विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या काही भागात आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडला. सुमारे पाऊण ते एक तास पडलेला हा पाऊस रब्बीसाठी काही प्रमाणात फलदायी ठरणार असला तरी, अवेळी पडलेल्या या पावसाने व गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने द्राक्ष बागायतदार हादरला असून द्राक्षपिकांवर दावण्या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. आज, शुक्रवारी सकाळपासून हवेत गारवा व ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विटा शहरात अचानक पावसास सुरूवात झाली. वेजेगाव, साळशिंगे, लेंगरे, नागेवाडी परिसरातही पाऊस झाला. भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी, कमळापूर, आळसंद, कार्वे, बामणी, पारे परिसरात तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. खानापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पूर्व भागातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार हादरला आहे. या पावसाने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. शाळगाव : शाळगाव, विहापूर, शिवनगर, कडेपूर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. आज दुपारपासून आकाश आभ्राच्छादित होते. सायंकाळी ५ च्या सुमारास हलक्या पावसाने सुरुवात केली. सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडल्या. या पावसाने ऊसतोडी थांबल्या. कडेगाव : आज, शुक्रवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. कडेगाव, नेवरी, ढाणेवाडी परिसरात सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, दिवसभर तालुक्यात सर्वत्र ढगाळ व थंड हवामान होते. (वार्ताहर)आटपाडी तालुक्यातही चिंतेचे ढग... आटपाडी : तालुक्यात आज, शुक्रवार दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाळी वातावरण झाल्याने अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील ज्वारी आणि डाळिंबाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी फुलोऱ्यात आहे. आता जर अवकाळी पाऊस झाला तर फुलोरा झडण्याची भीती आहे. फुलोरा झडल्यास कणसाला दाणे लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि धुके पडल्यास डाळिंबावरील कीड आणि रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डाळिंबाचेही मोठे नुकसान होण्याच्या भीतीने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शिराळ्यात अवकाळीने ऊसतोडी खोळंबल्यासागाव/पुनवत : शिराळा तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. या अवकाळी पावसामुळे शेतीच्या व ऊस तोडीच्या कामामध्ये व्यत्यय आला. तालुक्यात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर सूर्याने दर्शन देखील दिले नाही. सायंकाळी पाच वाजता अचानक आरळा, चरण, कोकरूड, सागाव, शिराळा, मांगले, पुनवत आदी परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी नुसताच शिडकावा झाला. या पावसामुळे ऊसतोडणी कामामध्ये व्यत्यय आला. वारणा नदीच्या पट्ट्यामध्ये गुऱ्हाळघरे जोमात सुरू आहेत. या पावसामुळे गुऱ्हाळ मालकांमध्ये चिंता वाढली आहे. रब्बी पिकांना मात्र हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. तासगावात जोरदार सरीतासगाव : तासगाव आणि परिसरातील गावांना रात्रीच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. सायंकाळपासून रिमझिम असलेल्या पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. शहरातील सिद्धेश्वर मंदिरनजीक लिंबाचे झाड पावसात कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा झाडाचा अडथळा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. नेवरी परिसरात गारपीटनेवरी : कडेगाव तालुक्यातील नेवरी परिसरात रात्रीच्या सुमारास गारपीटीसोबतच मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नेवरी परिसरातील ओढे-नाले पावसाने तुडुंब भरले असून अनेक ओढे वाहून गेले आहेत.
अवकाळीने पुन्हा कंबरडे मोडल
By admin | Published: December 13, 2014 12:02 AM