येळावी (जि. सांगली) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने, तसेच कर्तव्याच्या वेळेत कर्मचारी झोपेत असल्याने येथील एका महिलेची प्रसुती आरोग्य केंद्राच्या दारातच झाली. संतापाची बाब म्हणजे बाळाची नाळ कापण्यासाठीही कोणी कर्मचारी धावून आला नाही. अशा बिकट अवस्थेत नातेवाईकांनीच बाळासह महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.सोमवारी रात्री ही घटना घडली. येथील एका महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्याने ती रात्री आठ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली असता, तेथील कर्मचाऱ्यांनी तपासणी करून त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. यानंतर मध्यरात्री महिलेस असह्य वेदना होऊ लागल्याने महिलेस नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यावेळी आरोग्य केंद्रास आतून कुलूप लावून कर्मचारी झोपले असल्याचे निर्दशनास आले.
ही महिला व तिच्या नातेवाईकांनी त्यांना हाका मारल्या, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी आरोग्य केंद्राच्या दरवाजावर विटा, दगड मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर केंद्राच्या दरवाजासमोर या महिलेची प्रसुती झाली. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी तशा अवस्थेतच बाळ व बाळंतीणीस तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.