रिॲलिटी चेक
फोटो २३ संतोष ०१
सांगलीसाठी मोठ्या प्रमाणात खते आली असून रेल्वे मालधक्क्यावर उतरवून घेण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केले असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. दुकानांमध्ये जुन्याच महागड्या किमतीला खत विक्री केली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे.
खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने खतांना मागणी वाढली आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये गेल्या महिनाभरात कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली. काही खते तर आवाक्याबाहेर गेली. गोणीमागे ५०० ते ८०० रुपयांनी महागली. सर्व स्तरातून विरोध सुरू होताच केंद्र सरकारने लक्ष घातले व खतांवरील अनुदान वाढविले. त्यामुळे खतांच्या किमती कमी होतील, पूर्ववत जुन्या किमतीला मिळतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. बाजारात जुन्याच महागड्या किमतींना विकत घ्यावी लागत आहेत.
मृग नक्षत्र अद्याप लांब असल्याने सरसकट खतांना अद्याप मागणी नाही; पण उसासाठी डीएपीला प्रचंड मागणी आहे. द्राक्ष काड्यांसाठीही काही प्रमाणात खतांचा वापर सुरू आहे. ही खते वाढीव दराने विकली जात आहेत. कमी झालेल्या दराबाबत दुकानदारांना विचारणा केली असता जुनाच स्टॉक शिल्लक असल्याचे सांगितले जाते. कमी दराचा नवा स्टॉक आलेला नाही, कमी किमतीला पाहिजे असल्यास काही दिवस थांबा, असा सल्ला दिला जातो. नड असलेल्या शेतकऱ्याला थांबण्यासाठी सवड नसते. नाइलाजाने महागड्या किमतीलाच गोणी घ्यावी लागते.
केंद्र शासनाने २० मे रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले. स्फुरद अन्नद्रव्याचे अनुदान वाढविले, त्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा कृषी विभाग करत आहे. बाजारात मात्र प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे.
चौकट
- खतांवरील सुधारित अनुदानामुळे किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नव्या कमी किमतीमध्येच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे. जुन्याच महागड्या दराने विक्री होत असल्यास आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.
- भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६११७५००, टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तक्रार करता येईल. त्याशिवाय जिल्ह्याचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांकडेही दाद मागता येणार आहे.
चौकट
अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करावे
बाजारात सुरू असलेल्या लुटीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन केले पाहिजे. खरिपाचा हंगाम अद्याप दोन-तीन आठवडे लांब आहे, तोपर्यंतच अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी. तसे झाले तरच पंधरा दिवसांनी दर कमी होतील अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
कोट
खताच्या किमती कमी झाल्याचे सरकार सांगत असले तरी बाजारात महागड्या दरानेच विकत घ्यावी लागत आहेत. युरियाव्यतिरिक्त अन्य सर्व खते ५०० रुपयांनी महागली आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने घेतल्याशिवाय पर्याय नाही.
- बाळासाहेब पाटील, शेतकरी, आरग
खताच्या कमी झालेल्या किमतीनुसार मागणी केली असता स्टॉक संपल्याचे सांगितले जाते. वाढीव किमतीला गोणी घेतली, तरी त्याची पावती मात्र दिली जात नाही. तक्रारीचा सूर दाखवल्यावर खते शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. सरकारने निर्णय घेतला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही.
- रविकांत साळुंखे, शेतकरी, मल्लेवाडी
पॉइंटर्स
खत खताचे जुने दर खताचे नवे दर
१०-२६-२६ ११७५ १७७५
१२-३२-१६ १२३५ १८००
२०-२०-० ९७५ १३५०
डीएपी ११८५ १९००
सुपर फॉस्फेट ३७० ४७०
२४-२४-० १३५० १९००
२०-२०-०-१३ १०५० १६००
खरिपाचे लागवड क्षेत्र - ३,८४००० हेक्टर.