शिराळा : शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्यावतीने शिराळा तालुक्यातील पणुंब्रे वारुण येथे मंगळवार दि. २0 जानेवारी रोजी आठवे डोंगरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक उत्तम कांबळे यांची निवड झाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी दिली.२0 जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होणार आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी पत्रकार अशोक इंगवले, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन उपस्थित राहणार आहेत.मुख्य सत्रात १0.३0 वाजता उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुपारी १२.३0 ते २.00 या वेळेत ‘व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे स्थान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर) अध्यक्ष असून, प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे, दि. बा. पाटील, प्रा. विष्णू वासमकर, प्रा. संजय ठिगळे सहभाग घेणार आहेत.दुपारी ३ वाजता अंधकवी चंद्रकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित व नवोदितांचे कविसंमेलन होणार आहे. यामध्ये प्रा. भीमराव धुळूबुळू, ज्ञानेश्वर कोळी, डॉ. दीपक स्वामी, महेश कराडकर, स्वाती शिंदे-पवार, वसंत पाटील, सतीश लोखंडे, नंदू गुरव, नामदेव भोसले, वासंती मेरु, चंद्रकांत बाबर, नंदिनी साळुंखे, वैजयंती पेठकर, अभिजित पाटील आदी निमंत्रित व नवोदित कवी सहभागी होणार आहेत. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष कवडे, दयासागर बन्ने करणार आहेत.दुपारी ४.३0 ते ६.00 या वेळेत ग्रामीण विनोदी कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून, प्रा. आनंद पाटील, जयवंत आवटे, अशोक कुंभार सहभागी होणार आहेत. स्वागताध्यक्ष माजी सभापती हणमंतराव पाटील असून, संमेलन यशस्वी करण्यासाठी शब्दरंग कार्यकारिणी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ विशेष प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)
पणुंब्रेत मंगळवारी डोंगरी साहित्य संमेलन
By admin | Published: January 18, 2015 11:41 PM