सांगली : राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सांगलीत बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे सांगली जिल्ह्याचा मान राज्यात उंचावला आहे. पक्षाला आणि पर्यायाने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना यामुळे बळ मिळाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे सांगलीकरांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात, समाजकारणात आपली वेगळी छाप जयंत पाटील यांनी पाडली आहे. माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जिल्ह्याला मिळाले आहे.
जयंत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हे पद त्यांना मिळाले आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर घरच्या लोकांकडून त्यांचा सन्मान व्हावा, अशी इच्छा कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील विविध संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली होती.त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सांगलीच्या स्टेशन चौकात बुधवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार होणार आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनाही स्वतंत्र सत्काराची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे संबंधितांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन बजाज व पाटील यांनी केले.प्रा. पद्माकर जगदाळे, महापालिका विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, सचिन जगदाळे, राहुल पवार, मुश्ताक रंगरेज उपस्थित होते.वाद मिटले!बजाज व पाटील म्हणाले की, पक्षांतर्गत आमच्यात असलेले किरकोळ वाद आम्ही मिटविले आहेत. जयंत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आता आम्ही एकसंधपणाने काम करणार आहोत. महापालिका निवडणुकीत पक्षीय हिताला प्राधान्य देण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्यामुळे आम्ही आमच्यातील वाद आता बाजूला केले आहेत.