प्रताप महाडिक -- कडेगाव --विधानपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदार संघातून सांगली जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा कॉँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात निवडणूक प्रस्तावित आहे. या ११ जागा एकत्र लढविण्यावर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस नेत्यांचे २ सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमत झाले असले तरी, कोणी कोणत्या जागा लढवायच्या, याबाबतचा घोळ कायम आहे. यासाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. दरम्यान, सातारा, सांगलीतील सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असलेली जागा कॉँग्रेसला द्यावी, यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आग्रही आहेत. माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांना सातारा-सांगलीच्या या जागेवरून लढवावे, असा कॉँग्रेसचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोहनराव कदम यांच्या नावाला पाठिंबा मिळावा यासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही सातारा, सांगलीची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला द्यायची नाही, अशीच ठाम भूमिका घेतली असल्याचे समजते. मागील निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रभाकर घार्गे विजयी झाले होते. गेली ४० वर्षे मोहनराव कदम हे कॉँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन अविश्रांतपणे कॉँग्रेसचा प्रचार करीत आहेत. जिल्ह्यात कॉँग्रेसची ताकद वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नि:स्वार्थीपणे व निष्ठेने कॉँग्रेसचे काम करणाऱ्या मोहनराव कदम यांना अनेकवेळा सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीने हुलकावणी दिली. आता त्यांच्या कामाचे फलित म्हणून त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांचे एकमत झाले आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्तेही मोहनराव कदम यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जागा वाटपाचे वेध सर्वांना लागले आहेत. पतंगराव कदम हे कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे दिल्लीपर्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे कदम पिता-पुत्रांनी ताकद लावल्यास निश्चितपणे मोहनराव कदम यांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेत्यासाठी : युवकांचा पाठपुरावा
मोहनरावांच्या उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’
By admin | Published: September 06, 2016 10:40 PM