दत्ता पाटीलतासगाव : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तासगाव तालुक्यातील राजकीय वारेही उलट दिशेने वाहताना दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी अवैध धंद्याला आमदारांचा वरदहस्त मिळावा यासाठी संजयकाका गटातून आर. आर. आबा गटात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावल्याची मतदारसंघात चर्चा आहे.तासगाव तालुक्यात आर. आर. आबा गट विरुद्ध संजयकाका गट, असे पारंपरिक गट वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात राजकारणात सक्रिय आहेत. या दोन्ही गटांच्या विरोधात सक्षम तिसरा पर्याय अद्याप निर्माण झाला नाही. या दोन गटांतच टोकाचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात आबा गटातील अनेक बिनीचे शिलेदार संजयकाका गटात सहभागी झाले. सत्तेच्या लाटेवर स्वार होत, गट बदलणाऱ्या कारभाऱ्यांनी संजयकाकांच्या दहा वर्षांच्या खासदारकीचा पुरेपूर फायदा घेतला.बदलत्या राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा मतदारसंघात आयाराम गयाराम कार्यकर्त्यांचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध धंद्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या आणि अवैध धंद्याची पाठराखण करणाऱ्या कारभाऱ्यांना पक्ष बदलाचे वेध लागले आहेत. जुगार अड्डे, मटकाबुकी चालवणारे, वाळूची तस्करी करणारे काही कार्यकर्ते, आमदारांचा राजकीय वरदहस्त मिळावा, यासाठी आबा गटात जाण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आबा गटात फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. या कार्यकर्त्यांना आमदार रोहित पाटील आसरा देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकीय वरदहस्तासाठी गट बदल..माजी खासदार संजयकाका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीनंतर लागोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची राजकीय भूमिका अद्याप संदिग्ध राहिली आहे. दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांनी राजकीय वलय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी काका गटातील काही कारभारी आबा गटात येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.