कडेगाव : विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाट्यादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर (१६६ ई) हा २८३.०८० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. त्यासाठी १४७४.८९ कोटींची तरतूदही केली. सध्या या महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे येथील दुष्काळी भाग कोकण व कर्नाटकशी जोडला जाणार आहे व चांगल्या दर्जाचा रस्ता होणार आहे.
या महामार्गावर शिवणी फाटा ते येवलेवाडीदरम्यान महामार्गावर टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लागणाºया निधीची तरतूद ही महामार्गाच्या निधीतच केलेली आहे. त्यामुळे कडेगाव ते विटादरम्यान सध्या महामार्ग बांधणीचे काम करणारी एजन्सीच हा टोलनाका उभारणार आहे. त्यासाठी येथे आता भूसंपादनही करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक चारचाकी वाहनधारकांना येथे टोल द्यावा लागणार आहे. तसेच तालुक्यातील स्थानिक नागरिकांना या महामार्गावरुन सतत ये-जा करावी लागणार असल्याने त्यांनाही टोलनाक्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच येथील नागरिकांचा येथे होणाºया टोलनाक्याला तीव्र विरोध होत आहे.
कडेगाव ते विटा रस्त्यावर वीस किलोमीटरच्या परिघात विटा नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत व चाळीस ते पन्नास खेडी येतात. लाखो लोक या टोलनाक्याने प्रभावित होणार आहेत. कडेगाव ते विटा असे दररोज सुमारे हजारो व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार स्वत:च्या चारचाकी वाहनाने ये-जा करतात. या मार्गावरून बहुतांश शेतकºयांची फळे व भाजीपाला वाहनांद्वारे कºहाडकडे जातो. आता टोलनाक्यामुळे या सर्व वाहनधारकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.नव्या परिपत्रकाने : टोलचे संकटकेंद्र शासनाने नुकतेच टोलनाक्याबाबत परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या रस्ते बांधणीच्या प्रकल्पाची किंमत १०० कोटींच्या वर गेली आहे, त्या प्रकल्पाची किंमत ही टोलच्या रूपाने वसूल करावयाची आहे. त्यामुळे या महामार्गावर टोलनाका नियोजित असून, तो तालुक्यातील शिवणी फाटा ते येवलेवाडी यादरम्यान महामार्गावर उभारण्यात येणार आहे.टोलनाका होऊ देणार नाही : हौसाताई पाटील
कडेगाव तालुका दुष्काळी भाग आहे. येथील कामगार, शेतकरी दररोज दोन चारवेळा ये-जा करतात. हा टोलनाका आम्हाला मान्य नाही. ठेकेदार पोसण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर टोलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नाही. इंग्रजांप्रमाणे या टोलवाल्यांनाही पळवून लावू, असा इशारा क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांनी दिला.