ऐतवडे बुद्रूक : चिकुर्डे व डोंगरवाडी फाटा (ता. वाळवा) येथे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या माशांच्या उपद्रवामुळे परिसर शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ व जनावरे हैराण झाली आहेत. या त्रासाने शालेय विद्यार्थी आजारी पडत असल्याने मागील महिन्यात परिसरातील शाळेला १५ दिवस सुट्टी देण्यात आली होती.डोंगरवाडी गावच्या हद्दीमध्ये करंजवडे ते ठाणापुढे रस्त्यालगत पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीमधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे घातक माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर दमट हवामानामध्ये या माशांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिसरात आनंद गुरुकुल निवासी, तसेच लोकमान्य विद्यानिकेतन हायस्कूल अशा दोन शाळा आहेत. मागील महिन्यात या माशांचा उपद्रव एवढा वाढला होता की निवासी शाळेतील अनेक विद्यार्थी आजारी पडले होते. त्यामुळे शाळेला पंधरा दिवस सुटी द्यावी लागली होती. परिसरात अनेक शेतकऱ्यांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. या माशांच्या चाव्यामुळे गोठ्यातील अनेक जनावरेही आजारी पडली आहेत. डोंगरवाडी व चिकुर्डे येथील ग्रामसभेतही या पोल्ट्रीधारकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या माशांच्या उपद्रवामुळे शालेय विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य विभाग व शालेय विभागाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांतून होत आहे.
व्यवसाय करा पण दुसऱ्यांना त्रास का ?या पोल्ट्रीधारकाच्या बेजबाबदार व्यवसायामुळे शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व जनावरांना त्रास होत आहे. या व्यवसायिकांनी योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय करावा, असे अपेक्षा शाळेतील शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
ऐतवडे बुद्रूक परिसरात पोल्ट्रीमधील माशामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार सूचना करूनदेखील पोल्ट्रीधारक याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य विभाग व शालेय विभागाने या पोल्ट्रीधारकावर तातडीने कारवाई करावी. - मीनाताई मालगुंडे, मुख्याध्यापिका, आनंद गुरुकुल निवासी शाळा, चिकुर्डे